लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सर्वच अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अस्तित्व दाखविण्यासाठी या अवैध धंद्यांवर धाडसत्र राबविले. जवळपास चार ठिकाणी धाडी घालून मटका अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून धाडसत्र राबविण्यात आले. त्यासाठी पोलीस पथकांची अदलाबदल करण्यात आली. शहरातील आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज चौक, सिव्हिल लाईन, शासकीय रुग्णालय परिसर, वडगाव, मुलकी, उमरसरा, जामनकरनगर, भोसा यासह इतरही भागांत अवैध दारू विक्री व मटका सुरू आहे. हा व्यवसाय पूर्णत: कधीच बंद झालेला नाही. पोलीस कारवाई केल्यानंतर काही दिवस तो बंद ठेवून नंतर छुप्या पद्धतीने चालविला जातो. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कुठलाही अवैध धंदा चालणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात सर्वच ठिकाणी धंदे सुरळीत सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ३ जानेवारीपासून धाडसत्र सुरू केले. अवधुतवाडीच्या हद्दीतील ऑनलाईन लॉटरी जुगारावर व नंतर शारदा चौकातील मटका अड्ड्यावर धाड टाकली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडमोहा, तळेगाव, खाणगाव येथेही धाडी घालण्यात आल्या. महागाव तालुक्यातील मटका अड्ड्यांवरही स्थानिक गुन्हे शाखेने धाड घातली आहे. स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाल्यानंतर यवतमाळ शहरात उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले यांच्याकडून सुद्धा मोहीम हाती घेण्यात आली. शनिवारी अवधुतवाडीतील पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी पथकासह अप्सरा टॉकीज चौकातील मटका अड्ड्यावर धाड घातली. तेथून २८ हजारांचा मुद्देमाल ज्यात मोबाइल व काही रोख रक्कम समाविष्ट आहे. यासह दहा जणांना अटक करण्यात आली. त्याचवेळी अवधुतवाडी व शहर पोलिसांच्या पथकाने शारदा चौकातील मटका अड्ड्यावर धाड टाकली. त्याठिकाणी विशेष काही पोलिसांच्या हाती लागले नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा धाडसत्र सुरू केले आहे. याचा प्रभाव किती दिवस कायम राहतो, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे.
रस्त्यावरचे धंदे बंद करण्याचे आव्हान- अनेक वर्षांपासून रस्त्यावर चालणारे अवैध धंदे बंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. याशिवाय मोठमोठ्या उलाढाली होणारेही अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यांना रेकाॅर्डवर आणून कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. शहरातील अवैध धंदे, विशेष करून अवैध दारू विक्री, गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. दारू व गांजाच्या सेवनातूनच गुन्हे घडत आहेत. बालगुन्हेगारांची संख्या वाढत आहे.