लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तीन महिन्यांपूर्वी येथील प्रेमनगर परिसरातून देहविक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या खऱ्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानंतर वणी पोलीस कामाला लागले आहेत.नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने तीन महिन्यांपूर्वी वणी पोलिसांच्या मदतीने येथील प्रेमनगर परिसरातून देह व्यापारात गुंतलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सदर मुलीला नागपूर येथील करूणा महिला वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर वणी पोलिसांचे एक पथक दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे जाऊन आले. सदर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. अल्पवयीन मुलीची सुटका केल्यानंतर मध्यप्रदेशातील रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या राजूबाई नामक महिलेने ‘ती’ मुलगी आपली असल्याचा दावा करून तिचा ताबा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु सदर अल्पवयीन मुलीने राजूबाई ही आपली आई नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयापुढेही मोठा पेच निर्माण झाला. न्यायालयाने प्राथमिक तथ्य लक्षात घेऊन तिच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे राजूबाई व अल्पवयीन मुलीला रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड कुणी दिले, याची माहिती मिळविण्यात यावी आणि वसतिगृह अधीक्षक व वणी पोलीस वगळता कुणालाही ‘त्या’ अल्पवयीन मुलीची भेट घेऊ देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे.या प्रकरणावर आता २५ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार सदर मुलगी अल्पवयीन असताना बबिता नावाच्या नातेवाईक महिलेकडे तिला सोपविण्यात आले होते. त्यानंतर बबिताने ग्वाल्हेर येथे तिच्याकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतला. तेथून तिला वणी येथील रेखा नावाच्या महिलेकडे आणण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी देह व्यापाराच्या संशयावरून रेखाच्या घरी धाड टाकली. त्याठिकाणी सदर अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या प्रकरणात बबीता व रेखा यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले.मध्यप्रदेशात राबविले जाणार ‘सर्चिंग आॅपरेशन’पीडित अल्पवयीन मुलगी ही मध्यप्रदेशातील रहिवासी असून राजूबाई ही आपली आई नसल्याचा दावा तिने केल्यामुळे आता तिच्या खऱ्या जन्मदात्याचा शोध मध्यप्रदेशात घेतला जाणार असून त्यासाठी वणी पोलिसांचे पथक लवकरच रवाना होणार आहे.
पोलिसांकडून ‘तिच्या’ जन्मदात्यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 9:57 PM
तीन महिन्यांपूर्वी येथील प्रेमनगर परिसरातून देहविक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या खऱ्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानंतर वणी पोलीस कामाला लागले आहेत.
ठळक मुद्देवणीतील देह व्यापाराचे प्रकरण : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश