पुसदच्या दोघांना जामीन : सर्व ठाणेदारांना अलर्टयवतमाळ : विविध गंभीर गुन्ह्यातील जामीनावर सुटणाऱ्या आरोपींवर आता जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांचा वॉच राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सतर्कतेची ही नवी पद्धत सुरू केली आहे. पुसद येथील शाहरुखखाँ अन्सारखाँ व मो.आसिफ अब्दुल रऊफ रा.खतीब वॉर्ड या दोघांना वाटमारीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्याने २८ नोव्हेंबर रोजी त्यांची सुटका करण्यात आली. हे आरोपी जामीनावर सुटले असून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचा बिनतारी संदेश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना स्थानिक गुन्हे शाखेमार्फत पाठविण्यात आला आहे. हे आरोपी अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असेही आदेशात नमूद आहे. न्यायालयातून सुटणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील प्रत्येकच आरोपीचे रेकॉर्ड अपडेट केले जात आहे. तो कारागृहातून किती वाजता सुटणार इथपासूनची माहिती घेऊन पोलीस त्यांच्यावर वॉच ठेवतात. कारण सवयीचा गुन्हेगार असेल तर तो पुन्हा कुठेतरी गुन्हा करणारच. म्हणून पोलीस कारागृहातून निघाल्यापासूनच त्याच्या हालचालींवर नजर ठेवून असतात. या माध्यमातून घडणाऱ्या संभाव्य गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेमार्फत स्पष्ट करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी दररोज कारागृहात जावून जामिनावर सुटणाऱ्यांची यादीच तयार करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
कारागृहातून सुटलेल्या आरोपींवर पोलिसांचा वॉच
By admin | Published: November 29, 2015 3:02 AM