१७ संचालक : यवतमाळ-वणीतून सात उमेदवार मैदानात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष या सारख्या दिग्गजांनी उडी घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नागपूर बेस असलेल्या पणन महासंघाच्या १७ संचालक पदासाठी ११ जून रोजी निवडणूक होत आहे. ९ ते १५ मे या काळात नामांकन दाखल करण्यात आले. १७ जागांसाठी राज्यभरातून ६६ अर्ज दाखल झाले आहे. १६ मे रोजी नामांकनाची छाननी झाली. त्यात अनेक आक्षेप नोंदविले गेले. ३१ मे ही नामांकन मागे घेण्याची तारीख आहे. १७ पैकी ११ जागा या झोनच्या आहेत. महिलांसाठी दोन तर एस्सी-एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि आर्थिक दुर्बल या मतदारसंघातील प्रत्येकी एक जागा आहे. पणन महासंघावर अनेक माजी मंत्री, आमदार, खासदार यांनी संचालक म्हणून काम केले आहे. यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीतसुद्धा अनेक राजकीय दिग्गजांनी पणनच्या आखाड्यात उडी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पणन झोनमध्ये नांदेडचे नामदेवराव केशवे, परभणीचे पंडितराव चोखट व औरंगाबादचे विसपुते बिनविरोध निवडून आले आहेत. यवतमाळ, वणी, खामगाव, परळी, जळगाव, अमरावती, नागपूर, अकोला या झोनमधून कोण उमेदवार माघार घेतो यावर बिनविरोध निवडीचे गणित अवलंबून आहेत. ही माघार व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरु आहे. ती न झाल्यास ११ जून रोजी उमेदवारांना मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी हे पणनचे मतदार असून या मतदारांची संख्या ३०० वर आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष रिंगणात पणन महासंघाच्या यवतमाळ झोन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, पुसदचे आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख रिंगणात आहेत. या पैकी कोण माघार घेतो याकडे नजरा लागल्या आहेत. ययाती नाईकांसाठी सर्व काही ठरले असताना ऐनवेळी देशमुखांनी नामांकन दाखल केल्याने यवतमाळ झोनमधील राजकीय गणित बिघडल्याचे सांगितले जाते. एस्सी-एसटी मतदारसंघातून सुरेश चिंचोळकर रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे भुसावळचे माजी मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांचे आव्हान आहे. पणनच्या वणी झोन मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, टिकाराम कोंगरे यांच्यासह चंद्रपुरातील चंद्रशेखर धोटे (कोरपना) उमेदवार आहे. विशेष असे हे तीनही उमेदवार काँग्रेसचे आहेत. नागपूर झोनमधून माजी मंत्री रमेश बंग हेसुद्धा रिंगणात आहेत. ३१ मेनंतर पणनच्या बहुतांश मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यात आणखी काही संचालक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय दिग्गज पणन महासंघाच्या आखाड्यात
By admin | Published: May 20, 2017 2:34 AM