नगरसेवकांची नाराजी : समित्यांच्या सभेला कोरमच जुळेना !यवतमाळ : नगरपरिषदेतील विषय समिती निवड प्रक्रियेत बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुसंख्य असलेल्या भाजपच्या वाट्यालाच येथे दुय्यम पदे मिळाली. भाजपा नगरसेवकांकडून जाहीर नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी झालेल्या नियोजन आणि बांधकाम समितीच्या सभेला कोरमच जुळला नाही. त्यामुळे शेवटी या दोन्ही सभा बारगळल्या. विषय समितीवरून नगरपरिषदेतील राजकीय गुंता वाढला आहे. भाजप आणि शिवसेनेचे १७ नगरसेवक असूनही सत्तेतील महत्वाची पदे राष्ट्रवादीला दिली जातात. भाजपाचे आमदार मदन येरावार यांनी विधानसभा निवडणूक काळात अनेक नगरसेवकांना सभापती बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेळ निघून गेल्यानंतर त्यांनी शब्द फिरविल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीतही युवा नगरसेवकांने आपल्या नेत्याच्या विरोधात उघड भुमिका घेतली आहे. विषय समितीला कोरम नसल्याने उपस्थित राहण्याचा आदेश या नगरसेवकाने धुडकावून लावला आहे. विषय समितीचे कामकाजच होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा काही नगरसेवकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे कोणीच नेतृत्व करत नसून प्रत्येक जण व्यक्तीगत नाराजी व्यक्त करत आहे. नगरसेवकांवर पक्ष श्रेष्ठींनी निर्णय लादल्याने ही गुंतागुंत निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारी नियोजन आणि बांधकाम समितीची सभा होती. मात्र कोरमच पूर्ण झाला नाही. तेव्हा समिती सदस्यांना फोन करून बोलवूनही प्रतिसाद दिला नाही. शेवटपर्यंत सभेला पाच नगरसेवक तर बांधकाम समिती सभेला चार सदस्य उपस्थित होते. सभा तहकूब करण्याची नामुष्की नवनियुक्त सभापतींवर ओढवली. (कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रवादीशी जवळीकीने भाजपा आमदारावर नाराजी भाजपाचे आमदार मदन येरावार सत्तेत आल्यानंतर भाजप नगरसेवकांना मोठे पाठबळ मिळले. अंतर्गत वादविवाद संपुष्टात येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक निष्ठावंताचा अपेक्षा भंग झाला. विषय समिती निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीची नेते मंडळी वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी ठेवणाऱ्या भाजप सदस्यांनाच समितीमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आमदार येरावार यांचे राष्ट्रवादी प्रेम उघड झाल्याची प्रक्रियात भाजपच्या गोटात आहे. समिती निवड प्रक्रियेच्या माध्यमातून भाजपा नगरसेवकांना एकसंघ करण्याची संधी होती. तसा प्रयत्न करण्याऐवजी आमदारांनी समिती निवडणुकीच्या काळात मुंबई दौरा काढला. तेथूनच ठरल्याप्रमाणे सर्व समित्यांची निवड झाली. या निवड प्रक्रियेमुळे भाजपातच गटबाजी निर्माण झाल्याची खंत व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेत राजकीय गुंतागुत
By admin | Published: December 26, 2015 3:20 AM