हजारो रुपये पाण्यात : शासनाच्या पैशाचे वाटोळे करणाऱ्यांकडून वसुलीची मागणीकळंब : येथील जोडमोहा मार्गावरील दोन किलोमिटर अंतरावर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने बांबू पॉलीहाऊस निर्माण करण्यात आले. परंतु या पॉलीहाऊसचा कुठलाच उपयोग करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाचे पर्यायाने जनतेचे हजारो रुपये पाण्यात गेले. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईची मागणी करण्यात येत आहे. नर्सरी निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने वनविभागाच्या मालकीची जवळपास १० एकर जागा ताब्यात घेतली. त्या जागेला तार कुंपन घालण्यात आले. एवढेच नाही तर हजारो रुपये खर्च दाखऊन बांबू पॉली हाऊस निर्माण करण्यात आले. वास्तविकपणे या पाली हाऊसचे निरीक्षण केले तर अतिशय माफक रुपये खर्च झाल्याचे दृष्टीस पडते. असे असले तरी पॉली हाऊससाठी हजारो रुपये वसुल करण्यात आले. त्यामुळे या पॉली हाऊसच्या बांधकामाची चौकशी करण्याची गरज आहे. याठिकाणी लहान वृक्ष ठेवण्याचे नियोजन होते. वृक्ष मोठे करताना उन,वारा, पावसापासून संरक्षण मिळावे हा पॉली हाऊस निर्माण करण्याचा उद्देश होता. परंतु वृक्ष येण्यापुर्वीच पॉली हाऊसची दुर्दशा व्हायला लागली आहे. सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने पॉली हाऊस निर्माण करण्यात आले, त्यासाठी प्रयत्नच करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाच्या पैशाला चुना लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून सदरचे पैसे वसुल करण्याची नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात लागवड अधिकारी गवळी यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा उपक्रम वरीष्ठ पातळीवरुन देण्यात आला आहे. वृक्षांचे तापमान कंट्रोल करण्यासाठी बांबू पॉली हाऊसची निर्मीती करण्यात आली. परंतु अजुनपर्यंत एकही वृक्ष याठिकाणी ठेवण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)
सामाजिक वनीकरणाचे पॉलीहाऊस निकामी
By admin | Published: August 26, 2016 2:28 AM