पुसद : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात ३० बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या कोविड सेंटरची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा असून रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. स्वच्छतेचाही बोजवारा उडालेला आहे. या धक्कादायक प्रकाराला डाॅक्टरच जबाबदार असल्याचे सांगत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
राज्याच्या राजकारणात पुसदचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्व. वसंतराव नाईक व स्व. सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने पुसदने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. मात्र त्यांचीच कर्मभूमी असलेल्या पुसद उपजिल्हा रुग्णालयासह येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे असून त्याअंतर्गत ३० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. गोरगरीब कोविड रुग्णांची सोय व्हावी हा उद्देश होता. मात्र येथे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा नियमित केला जात नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून शौचासाठीही पाणी नाही. ड्युटीवरील डाॅक्टर व नर्सेसची रुग्णांना कुठलीही सहानूभूती दिसत नसून त्यांच्यापर्यंत जेवणाचा डबाही पोहोचविला जात नाही.
रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत असून अनेक रुग्ण हलगर्जीपणामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सेंटरमधील पंतप्रधान निधीमधून प्राप्त १० व्हेंटिलेटर अद्यापही तज्ज्ञांअभावी धूळ खात पडले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचाही काळाबाजार होत असल्याचा आरोप येथील रुग्ण संभाजीराव ठाकरे रा. वरुड यांचे चिरंजीव संतोष ठाकरे व त्यांचे जावई पोलीस निरीक्षक भाऊ वाकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. या कोविड केअर सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असून प्रशासन ढेपाळल्याचे ओमप्रकाश शिंदे रा. बोरगडी यांनी सांगितले.