लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : राज्य मार्गातून राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झालेल्या दारव्हा-कारंजा मार्गची शहराच्या हद्दीत प्रचंड दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दारव्हा-कारंजा हा २८२ क्रमांकाचा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. मात्र या मार्गाचे दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला. सध्या या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण, काही भागात डांबरीकरण तर काही भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने रस्त्याला मोठा विलंब लागत जात आहे. त्यात दारव्हा शहराच्या हद्दीत येणाºया मार्गाची दुरवस्था झाली आहे.बसस्थानक ते गोळीबार चौक, वनविभागाच्या कार्यालयाजवळील टर्निंग, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयासमोर खड्डे पडले. पोस्ट ऑफिस ते कारंजा नाकापर्यंतचा भाग पूर्णता उखडला. हा शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र कारंजा, अकोला, यवतमाळ, नेरकडे जाणारी व शहरातील वाहने तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोस्ट ऑफिस परिसरात वाहनांमुळे धूळ उडते. तसेच सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होतो. येथे शिवाजी हायस्कूल, पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस, दवाखाना यासह व्यापारी प्रतिष्ठाने व निवासस्थाने आहे.गर्दीच्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दखल घेतली जात नाही. पूर्वी मेंटनन्स होत होते. परंतु आता मात्र महामार्ग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.जीवावर बेतल्यानंतर रस्ता दुरुस्ती करणार का ?या मार्गावर जागोजागी नादुरुस्त रस्ता आहे. वाहनधारकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याच मार्गावर शनिवारी रात्री तरोडा ते लाख दरम्यान दुचाकीचा अपघात झाला. यात रामगाव (हरु) येथील दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतल्यानंतरच रस्ता दुरुस्त करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दारव्हा शहरातील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:00 AM
या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दारव्हा-कारंजा हा २८२ क्रमांकाचा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. मात्र या मार्गाचे दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खड्डे, धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वाहनधारकांच्या अपघाताचे प्रमाणही वाढले