यवतमाळ : गरीब आणि वंचितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गरिबांचा मोर्चा धडकला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. आझाद मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. नेताजी चौक, बसस्थानक चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी शिधापत्रिका, बीपीएल कार्ड, अंत्योदय कार्ड, अन्न सुरक्षा योजना, दुर्धर आजार पीडित योजना, रोजगार हमी योजना कार्ड, श्रावळ बाळ योजना, निराधार योजना, अपंग, विधवा, परित्यक्त्यांना घर बांधण्यासाठी जागा, आरोग्य पत्र, अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टा देण्याची मागणी केली. तसेच घरकुल, शौचालय, बेरजगारांना सरकारी नोकरी किंवा व्यवसायाकरिता विनाअट कर्ज देण्याची मागणी केली. प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. विदर्भ क्षेत्राचे संघटक मधुकर निस्ताने, हरिभाऊ पेंदोर, विठ्ठलराव धानोरकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीवर धडकला गरिबांचा मोर्चा
By admin | Published: August 31, 2016 2:06 AM