भूकंपाच्या नोंदीनंतर अंबोडा येथील माधवराव भोयर यांच्या घरी असलेल्या विंधन विहिरीचे पाणी उष्ण येत आहे. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत हातपंपाच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात भूगर्भातील हालचालींमुळे उष्ण पाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १४ जुलै रोजी भूजल सर्वेक्षण विभागाच्या चमूने बोअरवेलला प्रत्यक्ष भेट दिली. विंधन विहिरीचे स्थळ टोपोशिट क्रमांक ई/१३ मध्ये मोडते. त्याचे अक्षांश रेखांश काढण्यात आले.
भेटीदरम्यान विंधन विहिरीच्या पाण्याचे उष्णतामान ४० सेंटिग्रेडपर्यंत असल्याचे आढळून आले. पुढील रासायनिक पृथःकरणाकरिता पाणी नमुने गोळा करून ते जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहेत. या भूजलाचे उष्णतामान ४० सेंटिग्रेड असल्याची कारणमीमांसा प्राथमिकदृष्ट्या करण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे भूगर्भामध्ये कमी-अधिक प्रमाणात हालचाली (मायक्रो टेक्नोटिक ॲक्टिव्हिटीज) सुरू असतात. त्यामुळे भूकंपाचे कमी, अधिक धक्के जाणवतात.
बॉक्स
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे सखोल अभ्यासाची गरज
भूगर्भातील हालचालींमुळे भूस्तरामध्ये भंगा/चर तयार होतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान घर्षण होऊन भूगर्भीय उष्णता निर्माण होते. ही निर्माण झालेली भूगर्भीय उष्णता भूजलाशी संपर्कात आल्यास विहिरीद्वारे गरम पाणी येण्याची शक्यता असते. ही घटना ठराविक काळापुरतीच मर्यादित असते. कालांतराने विंधन विहीर मूळ तापमानात येण्याची शक्यता असते. तरी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे या घटनेचा सखोल अभ्यास करणे योग्य राहील, असा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.