- संतोष कुंडलकर
वणी (यवतमाळ) : राजकीयदृष्टीने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वणी विधानसभा मतदार संघातील सर्वच पक्षातील इच्छुक मुंबईत ठिय्या देऊन आहेत. विविध राजकीय पक्षांत युती-आघाडी झाली तरी, वणीत मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
वणी विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महत्वाचे राजकीय पक्ष राजकारणात सक्रीय आहे. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदार संघातून उमेदवार उभा करण्याची तयार चालविली आहे. वणीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी शिगेला पोहचली आहे. प्रस्थापित नेत्याला शह देण्यासाठी विरोधी गटाने जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. भाजपशी युती झाल्यास हा गट बंडखोरीचा मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे. इकडे कॉंग्रेसमध्येही चेहरा बदलविण्याचे प्रयत्न चंद्रपुरातून सुरू आहेत. त्यामुळे वणीतील कॉंग्रेसच्या निष्ठावंताच्या गटात प्रचंड अस्वस्थता आहे.
कॉंग्रेसच्या वाटेवर असलेल्या एका स्थानिक नेत्याला कॉंग्रेसची तिकीट देण्याचा घाट चंद्रपुरातून घातला जात आहे. जर कॉंग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या नेत्याला तिकीट दिली गेली तर कॉंग्रेसचा प्रस्थापित गट काय भूमिका घेईल, हा देखील सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. आघाडीच्या जागा वाटपात आतापर्यंत वणी मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. त्यासाठी परळीतील एक वरिष्ठ नेत्याच्या मित्रप्रेमाची मदत घेतली जात आहे. त्यात कितपत यश येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या सदर दावेदारासह शिवसेनेतील बहुतांश इच्छुक आठवडाभरापासून मुंबईत ठिय्या देऊन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कोणतीही दुफळी नसल्याने या पक्षापुढे कोणतेही राजकीय संकट नाही. या पक्षाचीदेखील निवडणूक लढण्याची तयार सुरू आहे.वणीत वादळापूर्वीची शांततानिवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जारी होऊ शकते. असे असतानाही वणी विधानसभा क्षेत्रात अद्याप पाहिजे तसा राजकीय माहौल तयार झालेला नाही. सर्वत्र शांतता दिसून येत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे मानले जात आहे. युती-आघाडीची घोषणा झाल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघात कोणत्या घडमोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.