लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. अशावेळी पैशांची गरज भासल्यास करायचे काय, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, डाक विभागाने ही समस्या सहज सोडविण्याची दिशा दिली आहे. परिसराशी संबंधित पोस्टमन घरी येईल आणि तुमच्या खात्यातील दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढून देईल.
बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचे अनुदान डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. ही रक्कम काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी केली जाते. ही बाब कोरोना संसर्गाच्या वाढीस पोषक ठरणारी आहे. ही गर्दी कमी व्हावी, शिवाय प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात अडकू नये, यासाठी डाक विभागाची सेवा महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. यासाठी नागरिकांना फक्त आपल्या परिसराशी संबंधित पोस्टमनशी संपर्क करायचा आहे. मात्र, यासाठी बँक खाते आधारला लिंक असावे लागणार आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती यवतमाळ डाक अधीक्षकांनी केली आहे.