खासदारांच्या नाराजीचा परिणाम : २४ तासात आदेश फिरविला, राज्यमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याचा सूर लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासातच ‘मातोश्री’ने स्थगनादेश दिला आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने हा स्थगनादेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. येथील दोन पैकी एका जिल्हा प्रमुखाला विधानसभा निवडणुकीसाठी मोकळे करण्यात आले. त्यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख बनविण्यात आले होते. त्यांच्या रिक्त जागेवर यवतमाळ शहर अध्यक्ष पराग पिंगळे यांना बढती देऊन जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा प्रमुख म्हणून पराग पिंगळे यांच्या नेतृत्वात सोमवारी शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘ढोल बडवा’ आंदोलनही केले. पिंगळे यांच्या जिल्हा प्रमुख पदावरील वर्णीचे शहरात व जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत होत असतानाच त्यांच्या या उत्साहावर विरजण पडले. नियुक्तीवरून २४ तास होण्यापूर्वीच त्यांच्या नियुक्तीला स्थगनादेश देण्यात आला. पिंगळे यांच्यासोबतच जिल्हा संघटक, सहसंपर्क प्रमुख या पदावरील नियुक्त्याही करण्यात आल्या होत्या. मात्र त्या सर्वच नियुक्त्यांना स्थगनादेश दिला जात असल्याचे शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले. तसे वृत्तही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामध्ये ११ जुलै रोजी उमटले. जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासात स्टे मिळण्यामागील राजकारण जाणून घेतले असता नेत्यांच्या वर्चस्वाचा मुद्दा पुढे आला. सूत्रानुसार, पराग पिंगळे हे महसूल राज्यमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड यांच्या खास मर्जीतील मानले जातात. त्यातूनच पिंगळे यांना बढती देण्यात आली होती. परंतु ही बढती देताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या ज्येष्ठ नेत्या, शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून भावनाताई यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून या परस्पर झालेल्या नियुक्तीमागील आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत या नियुक्तीला स्थगनादेश द्याच यासाठी साकडे घातले गेले. अखेर भावनातार्इंचा मुद्दा ग्राह्य मानून ‘मातोश्री’वरून पिंगळे व इतरांच्या नियुक्तीला स्थगनादेश देण्यात आला. खासदार व राज्यमंत्र्यांमध्ये धुसफूस, पक्षात उघड गटबाजीची चिन्हे मुळात संजय राठोड व भावनाताई गवळी यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर त्यांनी त्या भागात दौरे वाढविले. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठीही सुरू केल्या. त्यातूनच आता संजय राठोड लोकसभा लढविणार, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. दरम्यान कालपर्यंत भावनाताई गवळींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संजय राठोड यांनी गोंजारणे सुरू केल्याचा गवळी समर्थकांचा सूर आहे. एवढेच नव्हे तर राठोड यांनी भावनातार्इंचा गृहजिल्हा असताना त्यांना विश्वासात न घेता मंगरुळपीर येथील राजेश पाटील यांची वाशिम जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. या नियुक्तीने नाराजी होऊनही भावनातार्इंनी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच की काय यवतमाळात पिंगळे यांच्या नियुक्तीसाठी भावनातार्इंना विश्वासात न घेता दुसरा वार करण्यात आला. हा वार जिव्हारी लागल्याने भावनातार्इंनी थेट ‘मातोश्री’ गाठून पिंगळे व इतरांच्या नियुक्त्यांना स्थगनादेश मिळवित आपलेही वजन दाखवून दिले. नेत्यांमधील या भांडणाने शिवसेनेतील गटबाजी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गवळींवरील नाराज कार्यकर्ते राठोडांच्या मागे तर त्यांच्यावरील नाराज कार्यकर्ते गवळींच्या मागे उभे राहण्याची व त्यातून गटबाजीचे उघड प्रदर्शन होण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीला स्थगनादेश
By admin | Published: July 12, 2017 12:23 AM