यवतमाळ, दि. 16 - पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावखेडे किंवा नगरातीलच नव्हे तर प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील रस्तेही खड्डेमय झालेले आहेत. कंत्राटदारांचा बहिष्कार असल्याने हे खड्डे बुजवण्याची सोय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाही. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व विकास नगरपरिषदेतील भाजपा व शिवसेनेच्या वादात रखडले आहे.
अशीच काहीशी अवस्था जिल्हा परिषदेतही आहे. तेथे पदाधिकारी विरुद्ध अधिकारी असा वाद असल्याने कुणीच कुणाला सहकार्य करताना दिसत नाही. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. प्रमुख मार्गच नव्हे, पॉश वस्त्यांमधील रस्त्यांवरसुद्धा मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांबाबत सावधगिरीच्या सूचना देण्याची तसदीही बांधकाम खात्याकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.