यवतमाळ : पुसद व तालुक्यात वीज वितरण कंपनीने सोमवारी धाडसत्र राबविले. यात तब्बल १५ लाखांची वीज चोरी उघडकीस आली आहे.
पुसद उपविभाग अंतर्गत शहरासह लक्ष्मीनगर, कासोळा, मांजरजवळा, जाम बाजार, बोरी खु., सावरगाव बंगला आदी गावांमध्ये धाडसत्र राबविण्यात आले. यात अनेक ठिकाणी वीजचोरीचे अफलातून प्रकार समोर आले. काहींनी मीटरमध्ये रिमोट कंट्रोल किट बसवून वीजचोरी केली. अनेकांनी मीटरला मागील बाजूने छिद्र पाडून रेजिस्टंट टाकले, मीटरची गती कमी करण्यासाठी मॅग्नेटचा वापर केला, मीटर बायपास केले, आदी प्रकार उघडकीस आले आहेत.
पुसदचे कार्यकारी अभियंता संजय आडे यांच्या मार्गदर्शनात व उपकार्यकारी अभियंता डी. एच. राजपूत व त्यांच्या चमूने धाडसत्र राबविले. या मोहिमेत एकूण ५४ ठिकाणी तब्बल ६६ हजार २७८ युनिट अर्थात १५ लाख ३२ हजार ९८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळले. या प्रकरणी फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणकडून केली जाणार आहे.
वीजचोरी प्रकरणी एक संधी म्हणून ग्राहकांना तडजोड शुल्क भरून फौजदारी दाखल करण्यापासून सुटका मिळण्याची संधी दिली जाते. मात्र, दुसऱ्या वीजचोरी प्रकरणात ग्राहकांवर थेट गुन्हा दाखल केला जातो. वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.
दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा
वीज चोरट्यांना तडजोड शुल्कासह वीजचोरीची रक्कम भरण्याची संधी दिली जाते. मात्र, तडजोड शुल्क भरणाऱ्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३ कलम १३५ नुसार फौजदारी दाखल केला जातो. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली. तालुक्यात वीजचोरीचे प्रमाण वाढत असल्याने आता महावितरणने मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.