यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांकडे शेकडो कोटी रुपये थकीत आहे. ग्राहकांनी गेल्या वर्षभरापासून, तर काहींनी त्याही पूर्वीपासून विद्युत देयक भरले नाही. पर्यायाने थकबाकीचा आकडा वाढतो आहे. ही थकीत वसुली करण्यासाठी महावितरणने गुरुवारपासून मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी या मोहिमेत ७८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून नऊ लाख रुपयांच्या थकीत देयकांची वसुलीही केली आहे.
अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संजय चितळे यांच्या नेतृत्त्वात ही धडक मोहीम राबविली गेली. महिला अभियंता व कर्मचाऱ्यांचे दामिनी पथक तयार करून शहराच्या विविध भागांमध्ये ही मोहीम राबविली गेली. पुरवठा खंडित करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही सोबत घेऊन हे पथक धडकले. विद्युत बिलाचे सुलभ हप्ते पाडूनही ते न भरणाऱ्या ग्राहकांवर पुरवठा खंडितची कारवाई करण्यात आली. मार्च अखेरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले. मनीषा बुरांडे यांच्या नेतृत्त्वातील या दामिनी पथकामध्ये नीलिमा काळे, ममता हेमके, मीनल परचाके, मेघा जयस्वाल, कीर्ती बडवे, नंदिनी मेश्राम आदी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.