उमरखेड (कुपटी) : गेल्या १५ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे रुग्णांना योग्य व वेळेवर सेवा मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा कल खासगी रुग्णालयांकडे वाढत आहे. याचाच फायदा घेत काही खासगी रुग्णालयांनी गोरगरीब रुग्णांची लूट चालविली आहे. उमरखेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या मुळावा, विडूळ, ढाणकी, थेरडी, सोनदाबी कोरटा या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे ३६ उपकेंद्रांमध्ये रुग्ण मावेनासे झाले आहे. वातावरणातील बदल, अस्वच्छता तसेच आरोग्य यंत्रणेच्या उदासिनतेमुळे तालुक्यात डेंग्यु सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. याचा गैरफायदा घेऊन काही खासगी डॉक्टरांनी रुग्णांची लूट सुरू केली आहे. गावागावात सध्या ताप, खोकला, सर्दी, हिवताप या सोबतच विविध आजारांनी डोके वर काढले आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे गावात पोहोचत नसल्याने अनेक गोरगरीब व अशिक्षित रुग्ण मेडिकल स्टोअर्समधून आपल्याच मताने औषधीची खरेदी करीत आहे. या गोळ््यांनीही आजारात फरक पडत नसल्याने रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये धाव घेतात. परंतु त्याठिकाणी डॉक्टर उपस्थित नसतात. औषधीही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी मेडिकलमधून आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे औषध खरेदी करावे लागते. तालुक्यातील बाळदी, मार्लेगाव, पार्डी, धानोरा, देवसरी, खरूस, सुकळी, थेरडी, खरबी, दराटी, कोट्टा, भवानी, कुर्ली, अमडापूर, पिंपळदरी, गाजेगाव, कृष्णापूर, बोरी, ब्राह्मणगाव, मोरचंडी, जेवली आदी उपकें्रदांमध्ये आरोग्य सेविकां व आरोग्य सेवक उपस्थित राहत नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. अशावेळी खासगी रुग्णांलयांमध्येसुद्धा रुग्ण नागविल्या जात आहे. खासगी डॉक्टरांकडून रुग्णांना रक्त तपासणीसाठी पॅथॉलाजीमध्ये पाठविण्यात येते. त्याठिकाणी रक्तांतील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यू सदृष्य आजाराने अनेकांना ग्रासले आहे. असे असतानाही शासकीय आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपचार मिळत नाही. यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधीसुद्धा पुढाकार घेताना दिसत नाही. उमरेखड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार रुग्णालयात दररोज ५०० हुन अधिक तापाचे रुग्ण तपासणीसाठी दाखल होत असल्याची नोंद आहे. परंतु याठिकाणीही डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. यामुळे आयुष अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद तज्ज्ञ प्रदीप शिंदे व होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ. अजमत जागिरदार हे दोघेच गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांवर उपचार करीत आहेत. परंतु यामध्येही आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. उमरखेड शहरासह ढाणकी, बिटरगाव, मुळावा, विडूळ, पोफाळी, निंगणूर, दराटी, याठिकाणच्या खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. (वार्ताहर)
खासगी डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक लूट
By admin | Published: November 01, 2014 11:15 PM