उत्कृष्ट कामगिरी : गुन्हे प्रतिबंधासाठी एसपींच्या टिप्स यवतमाळ : शहरासह जिल्ह्यात झालेल्या अनेक चोऱ्या आणि घरफोड्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी पार पाडणाऱ्या पोलिसांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. येथील पोलीस मुख्यालयात शनिवारी गुन्हेविषयक आढावा बैठकीपूर्वी सत्कार करण्यात आला. यवतमाळच्या दत्त चौकातील दत्त मंदिरात झालेली चोरी, पंकज नानवाणी यांच्या घरी पडलेला दरोडा उघडकीस आणल्याप्रकरणी वडगाव रोड ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, गजानन धात्रक, बंडू मेश्राम, गौरव नागलकर, रावसाहेब शेंडे, आशीष चौबे, बबलू चव्हाण, रूपेश लामाटे यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक दारव्हा मार्गावरील सतीश फाटक आणि पुसद येथील चिद्दरवार यांच्या घरी झालेल्या धाडसी घरफोडीतील आरोपींना पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कामगिरी पार पाडली. वसंतनगर-पुसदचे ठाणेदार सदानंद मानकर, एलसीबीचे ठाणेदार संजय देशमुख यांच्यासह पथकातील एपीआय नितीन पतंगे, कविश पाळेकर, किरण पडघन, ऋषी ठाकूर, प्रदीप नाईकवाडे, हरिश राऊत, शकील, गजानन डोंगरे, सचिन हुमने, भीमराव शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शहर ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने बॉम्बे हार्डवेअरमधून चोरी गेलेल्या चार लाखांचा तपास अवघ्या दहा तासात पूर्ण केला. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, विनोद राठोड, संजय दुबे, महेश मांगुळकर यांचा सत्कार केला. या शिवाय कळंबचे ठाणेदार कराळे यांनी वाटमारीचे दोन गुन्हे उघड केले. त्यांचाही पथकासह गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोले, शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत, यांच्यासह जिल्ह्यातील संपूर्ण ठाणेदार उपस्थित होते. हा सत्कार सोहळा आटोपल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीतून मार्गदर्शन केले. दुपारी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. (शहर वार्ताहर)
पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By admin | Published: July 24, 2016 12:45 AM