यवतमाळ : रविवारी (दि. ४) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यात काढणीला आलेली ज्वारी भिजली. भुईमूग आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दुपारी शेतकऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागली. अचानक बरसलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. याचा फटका यवतमाळ, दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, उमरखेड, कळंब तालुक्याला बसला.
मजूर टंचाईमुळे काढणी अवस्थेत असलेले उन्हाळी पीक शेतकऱ्यांना वेळेपूर्वी काढता आले नाही, तर काही शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांची लागवड करताना मोठा विलंब झाला. यामुळे अनेक पीक उशिरापर्यंत काढण्याचे काम सुरू आहे. यात खासकरून ज्वारीचा समावेश आहे. ज्वारी पिकांच्या काढणीकरिता मजूरच उपलब्ध होत नसल्याने ज्वारीची खुडणी लांबली आहे. काढणी अवस्थेत असलेल्या कंसावर शिरवा आला. यामुळे ज्वारीला कोंब फुटण्याची शक्यता आहे, तर ज्वारी काळी पडण्याचा धोका वाढला आहे. बैलांच्या वैरणाला याचा मोठा फटका बसणार आहे.
यासाेबतच तिळाच्या पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. तीळ सोंगल्यानंतर वाळण्याच्या अवस्थेत असलेला तीळ ठोकण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर पाऊस बरसल्याने तिळाला मोठा फटका बसला आहे. याशिवाय भुईमुगाचे पीक काढणी अवस्थेत आहे. काढणीसाठी अनेक ठिकाणी मजुरांची टंचाई आहे, तर बाहेर जिल्ह्यातून मजुरांना पाचारण केले जात आहे. याचा काढणीचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असतांना त्याला पावसाने पुन्हा फटका बसला आहे.
वीज पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू
दिग्रस/सिंगद : तालुक्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एका बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला, तर एक मजूर किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी दिग्रस शहरातील गुरुदेवनगर परिसरात घडली. शेख असिफ कादर शेख (वय ३२, रा. देऊरवाडी पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे, तर शेख सलीम शेख हमजा (३०, रा. देऊरवाडी) हा घटनेत जखमी झाला आहे.
दिग्रस शहरात रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान मृतक शेख असिफ व शेख सलीम हे दोघे गुरुदेव नगरातील एका घरावर बांधकामाचे काम करीत होते. त्यावेळी परिसरात अचानक वीज पडली व शेख असिफ हा जिन्यावरून खाली पडला. त्याला व त्याचा सहकारी शेख सलीम यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान असिफ यास मृत घोषित करण्यात आले. जखमी सलीम यांच्यावर उपचार करण्यात आले. मृतक हा बांधकाम कंत्राटदार तर शेख सलीम हा मजूर म्हणून काम करीत होता. तो मुका आहे. मृतक असिफ यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
वीज तारा पडून घराला आग
महागाव : रविवारी आलेल्या पावसादरम्यान वीज तारा घरावरून पडल्याने घर जळाले. ही घटना दुपारी ४ वाजता तालुक्यातील काळी दौं. येथे घडली. तालुक्यातील काळी दौ. गावात रविवारी दुपारी जोरदार पाऊस बरसला. त्यावेळी बंडू कोंडबा सावंत (६५) यांच्या घरावर विद्युत तारा पडल्या. त्यामुळे ठिणग्या पडून संपूर्ण घराला आग लागली. यात सावंत यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.
पईचे पीक गारद
पुसद तालुक्यातील पार्डी परिसरात रविवारी दुपारी वादळी- वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये पार्डी येथील शेतकरी नीलेश देशमुख यांचे तीन एकर पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.