लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : पालिकेतील सफाई कामगार अनिल अशोक उभाळे (३५) यांनी बुधवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येला शिवसेना महिला पदाधिकारी जबाबदार असून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नातलगांनी पोलीस ठाण्यासमाेर ठिय्या दिला. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.अनिल याला शिवसेना उपशहरप्रमुख अर्चना अरविंद राठोड ही महिला वारंवार शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप नातलगांनी केला. त्यामुळेच अनिलने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा दावा केला. आत्महत्येपूर्वी अनिलने व्हिडिओ क्लिप तयार केली. त्यात अर्चना राठोड यांच्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातलगांनी २ तास ठिय्या आंदोलन केले. नंतर पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आंदोलनकर्त्याच्या मागणीनुसार अर्चना राठोड हिच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.मृत अनिल उभाळेला अर्चना धमक्या देत होती. वारंवार पाच लाखांची मागणी करीत होती. अनिलने तिला कर्ज काढून दोन लाख रुपये दिले. तरीही अर्चना पैशाची मागणी करीत होती. अनिलने पैसे देऊ शकत नसल्याने आत्महत्या करीत आहे, असा व्हिडिओ तयार करून व्हाॅयरल केला. नंतर आत्महत्या केली. या व्हिडिओमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनिलने नाव घेतलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला कठोर शासन करावे. तिला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी अनिलची पत्नी रमा उभाळे व नातेवाईकांनी केली.
मृताच्या पत्नीने दिली तक्रार- मृत अनिल यांची पत्नी रमा यांनी घटनेची रीतसर तक्रार दिली. त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांसह पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी अर्चना अरविंद राठोड हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी मागणे व अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार सोनाजी आमले पुढील तपास करीत आहे.
अर्चनाचा शिवसेनेशी संबंध नाही- गुन्हा दाखल झालेल्या अर्चना अरविंद राठोड या महिलेशी शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक संजीवनी शेरे यांनी सांगितले. शिवसेनेच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहून तिने काम करण्याची इच्छा जाहीर केली होती. मात्र, तिने कधीही प्रवेश केला नाही. तिला सदस्य म्हणून नियुक्ती पत्र सुद्धा दिले नाही. तिचा कुठलेही पदाधिकारी व शिवसेना महिला आघाडीसोबत काहीही संबंध नसल्याचे संजीवनी शेरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.