लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गर्भवती वाघिणीला गुहेत डांबून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिला ठार मारल्याच्या घटनेतील आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आले असून या प्रकरणाचा गुंता लवकरच सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाच्या तपास कामात मुकूटबनचे पोलीस सरस ठरले आहेत.मुकूटबन वनपरिक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ३० मध्ये एका नाल्याच्या काठावर असलेल्या गुहेत २५ एप्रिल रोजी गर्भवती वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी वाघिणीच्या पुढील पायाचे दोन्ही पंजे तोडून नेण्यात आल्याचे दिसून आले. तीन दिवस उलटूनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही धागेदोरे गवसत नसल्याने अखेर २८ एप्रिलला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील हे वनविभागाच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके व वनविभागाची चार पथके गठित करण्याचे निर्देश दिले.
या सर्व पथकांचे नेतृत्व वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार, पांढरकवडाचे एसडीपीओ प्रदीप ठाकरे, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी, मुकूटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने, पाटण पोलीस ठाण्याच्या प्रभारी संगीता हेलोंडे यांच्याकडे देण्यात आले. गेले दोन दोन दिवस हे सर्व पोलीस अधिकारी मुकूटबन परिसरात तळ ठोकून होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुकूटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने यांच्या पथकाला वाघिणीच्या मारेकऱ्यांचा मागमूस लागल्याची माहिती असून शुक्रवारी सकाळी पोलिसांची एक कुमक मारेकऱ्याला पकडण्यासाठी रवाना झाली. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत ही कुमक परत आली नव्हती. सायंकाळपर्यंत या प्रकरणाचा तिढा सुटण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.