यवतमाळ : दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या मागणी व दबावामुळे आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना याच पदावर कायम ठेवण्यासाठी आता आमदारांनी प्रयत्न चालविले आहे. याच अनुषंगाने ९ जुलै बुधवार रोजी मुंबईत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांच्या मुलांना आगामी विधानसभेचे तिकीट देऊ नये, अशी मागणी करीत काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जाहीर बंड पुकारले होते. सोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा थेट सोनिया गांधींकडे पाठविला. दरम्यान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दुसऱ्या फळीतील या असंतुष्ट नेत्यांची आपल्या बंगल्यावर बैठक बोलावून त्यांची समजूत काढली. अपेक्षेनुसार या असंतुष्टांनीही प्रदेशाध्यक्षांपुढे नांग्या टाकल्या. त्यावेळी कासावारांचा राजीनामा मंजूर झाला असून पुढील आठवडाभरात नवा जिल्हाध्यक्ष जाहीर होईल, अशी माहिती ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान कासावार यांनीही ‘बाह्या वर करीत’ आगामी विधानसभेत सर्वांनाच धडा शिकवू असा तंबीचा सूर आळवला. त्यामुळे नेते मंडळी अस्वस्थ झाली. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने कुणाचीही नाराजी नको म्हणून अखेर काँग्रेस नेत्यांनी सारवासारव सुरू केली. त्यातूनच आता कासावार यांना जिल्हाध्यक्ष पदावर कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. एका नेत्याने तर स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून हे निवेदन सोनिया गांधींकडे पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार आणि काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कासावारांचे जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्याबाबत या बैठकीत एकमत होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कासावारांना जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्यासाठी दबाव
By admin | Published: July 08, 2014 11:40 PM