यवतमाळ : एका सुवर्णकाराला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करून दीड तोळे सोने लंपास करण्यात आले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कलगाव टी पॉइंट येथे उघडकीस आली आहे.
देविदास दार्वेकर (५२) असे सुवर्णकाराचे नाव आहे. ते महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रहिवासी आहे. बुधवारी त्यांनी लेवा येथील ग्राहकाचे दीड तोळे सोन्याचे दागिने बनवून आणले होते. ते ग्राहकाला देण्यासाठी सकाळी ते लेवा येथे जात होते. कलगाव टी पॉइंटवर दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविले. धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्याजवळ चोरीचा माल असल्याचे सांगून त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीत काही रोख रक्कम व दागिने घेऊन परत बॅगमध्ये ठेवल्याचा बहाणा केला. नंतर दोन्ही भामटे दुचाकीने निघून गेले.
नंतर दार्वेकर लेवाकडे रवाना झाले. तेथे त्यांनी ग्राहकाला देण्यासाठी दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दागिने बॅगमध्ये आढळून आले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच महागाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड तोळे सोन्याची किंमत एक लाख ४२ हजार रुपये दर्शविण्यात आली आहे.
पाेलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह
तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहराच्या मध्यवस्तीत एका किराणा दुकानातून तब्बल सात दिवस चोरी करणारा अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांचे पेट्रोलिंग नसल्यामुळे नागरिक दहशतीत वावरत आहेत. भामटे इराणी टोळीचे सदस्य असावे, असा पोलिसांचा कयास आहे. सहा महिन्यांपूर्वी महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याला लुबाडले होते.