रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे, तूरडाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या तुरीचे दर जैसे थे आहे. तरी व्यापाऱ्यांनी तूरडाळीचे दर किलोमागे २० रूपयांनी वाढविले आहेत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा नफा व्यापाऱ्यांच्या पदरात पडला आहे. तर शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला.गरिबांनाही तूरडाळ खरेदी करता यावी म्हणून रेशन दुकानामधून तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही तूरडाळ मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची प्रक्रिया वाढली. याच सुमारास पुरवठा विभागाने डाळीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्यभरातील पुरवठा विभागात धडकले आहेत. यामुळे रेशनवरची तूरडाळ १५ रूपयांनी महाग होणार आहे.दोन वर्षांपूर्वी तूरडाळ १४० रूपये किलोवर पोहोचली होती. गरीब कुटुंबांना ही डाळ खरेदी करणे म्हणजे स्वप्न ठरले होते. राज्यशासनाने हस्तक्षेप करून स्वस्तधान्य दुकानातून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. ४० रूपये किलो दराने तूरडाळीचा पुरवठा सुरू झाला. यामुळे नागरिकांची पहिली पसंती तूरडाळीला मिळाली. रेशन दुकानातून तूरडाळ खरेदीचे प्रमाण वाढले.तूरडाळीची मागणी रेशन दुकानात वाढल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच व्यापाऱ्यांनी नवीन खेळी केली आहे. स्वस्तधान्य दुकानातील ४० रूपये किलोची तूरडाळ ५५ रूपये किलो झाली. यामध्ये किलोमागे १५ रूपयांची वाढ करण्यात आली. याच संधीचा फायदा घेत तूरडाळ व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ६५ रूपयांवरून ८५ रूपयांवर नेले.क्विंटलमागे दोन हजारांचा नफाज्या तुरीपासून डाळ तयार होते, त्या तुरीचे दर ४७०० ते ५००० रूपये क्विंटल आहे. एका क्विंटलपासून ७२ किलो डाळ तयार होते. २८ किलोचे बेसन आणि कनोर मिळते. त्याचे पैसे वेगळे. ७२ किलो तूरडाळीचे पैसे आणि २८ किलो बेसन आणि कनोर याचा सध्याचा दर धरला तर क्विंटलमागे दोन हजार रूपयांचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. विशेष म्हणजे, एक क्विंटल तूरडाळीवर प्रक्रिया करण्यासाठी विजेचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना वर्षभर घाम गाळून जो नफा मिळाला नाही, तो नफा काही तासात व्यापाऱ्यांनी खिशात पाडून घेतला आहे.
तुरीचे दर पडलेलेच अन् तूरडाळ उसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:11 PM
रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे.
ठळक मुद्देनफा व्यापाऱ्यांच्याच घशात रेशनची डाळ महागताच व्यापाऱ्यांनी दर वाढविले