लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना लाॅकडाऊनच्या काळामध्ये जाहीर केली. या योजनेत अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. यापाठोपाठ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून मे आणि जून महिन्यात धान्य वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री योजनेतून मोफत धान्य एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलच्या मध्यात काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याचा उचल केला होता. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे.
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा
लाॅकडाऊनमुळे हाताला काम नाही. मजुरीचे काम बंद झाली आहे. यामुळे जे काम उपलब्ध होईल, त्यावरच गुजराण सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत धान्य एप्रिल महिन्यात उपलब्ध झाले नाही. पुढील महिन्यात ते उपलब्ध होणार आहे. किमान मिळणाऱ्या धान्यामुळे पोटाचा तेवढा आधार झाला आहे. - प्रीतम काळे
लाॅकडाऊनमुळे सगळेच घरी आहेत. हाताला कामही उपलब्ध नाही. मी गाडी चालवत होतो. आता ती बंद आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न आहे. काम लागले, तरच मजूर मिळते. अशा परिस्थितीत मिळेल त्यात भागविण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. - अमीत परचाके
बिकट परिस्थितीत बटईने शेत केले. त्यात हातात कुठलेही पीक आले नाही. भुईमुगातून रोजमजुरीचे पैसे मिळणेही अवघड झाले आहे. पुढील काळात कसे होईल, हा प्रश्न कायम आहे. आर्थिक टंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. मोफत धान्य लवकरात लवकर मिळावे. गावपातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा.- आकाश ढंगारे
दोन्ही योजनांवर धान्यराशन दुकानामधून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनांतील धान्य एकाच वेळी उपलब्ध होत आहे. यामध्ये गहू आणि तांदुळाचा समावेश आहे. - सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी