यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जम्मू काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदी पांढरकवड्यात येणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र मोदी येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे.
सुरक्षा यंत्रणेने मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. साडेचार हजारांवर पोलीस पांढरकवडा येथे तैनात आहेत. पाच हेलिपॅड बनविण्यात आले आहे. २८ एकर जागेत महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. बचत गटाच्या सुमारे ३ लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. या मेळाव्याला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.