दवाखाने बंद : रूग्णांचे झाले हाल, पॅथॉलॉजी लॅबचाही सहभाग यवतमाळ : संपूर्ण राज्यात डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे डॉक्टर असुरक्षित झाले आहे. त्यांच्या सुरक्षेची हमी शासनाने घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद होते. पॅथॉलॉजी लॅबही बंद होती. यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावीत झाली. रूग्णांचे प्रचंड हाल झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. नंतर डॉक्टरांनी मोर्चा काढला. त्यात आयएमएचे सदस्य, मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. येथील संजीवनी हॉस्पीटलपासून निघालेल्या मोर्चाची सांगता वैद्यकीय महाविद्यालयात झाली. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्याच्या निषेध मूकमोर्चाच्या माध्यमातून नोंदविण्यात आला. यावेळी फलक उंचावून डॉक्टरांनी लक्ष वेधले. २०१० च्या संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक हल्याची माहिती एफआयआरमध्ये नोंदविली जावी. डॉक्टरांना त्वरित दाद मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक न्यायालयाची व्यवस्था करावी. डॉक्टरांसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात यावा. यासह विविध मागण्या त्यांनी केल्या. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजा कडूकार, डॉ.दीपक शिरभाते, डॉ. सुरेखा एलनारे, डॉ. नीलेश यलनारे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. तृप्ती सारस्वत, डॉ. दिलीप देशमुख, डॉ. टी.सी. राठोड, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. स्रेहा भुयार, डॉ. दीपक सव्वालाखे, डॉ. योगेश मोतेवार, डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. संदीप धवणे आदी सहभागी झाले होते. आंदोलनाला आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वैद्यकीय समितीने पाठिंबा दिला. विदर्भ विभाग प्रमुख सूरज दत्तात्रे, विजय नवघरे, सागर चिल्लोरे यांच्यासह अनेक जण मोर्चात सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
खासगी डॉक्टरांचा संप
By admin | Published: March 23, 2017 12:16 AM