जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शालेय बॅडमिंटनपटूंचा सराव बंदयवतमाळ : येथील नेहरु स्टेडियममधील बहुउद्देशीय हॉलमध्ये सुरु असलेले बॅडमिंटनचे खाजगी प्रशिक्षण तत्काळ बंद करून तेथे शासकीय स्तरावर प्रशिक्षक नियुक्त करावा, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. त्यामुळे ६० ते ७० शालेय बॅडमिंटनपटूंचा सराव बंद झाला. याबाबत खेळाडूंच्या पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या देखरेखीखाली नेहरु स्टेडियमच्या परिसरात बॅडमिंटन, स्केटिंग, तायक्वांदो, फुटबॉल आदी खेळांचे प्रशिक्षणवर्ग चालविल्या जातात. येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्यावतीने गेल्या ३ वर्षांपासून शालेय खेळाडूंसाठी बॅडमिंटन प्रशिक्षण वर्ग राबविल्या जातात. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी संघटनेतर्फे एनआयएस प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू व शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील ३ प्राध्यापक नियुक्त आहेत. संघटना प्रशिक्षण शुल्क म्हणून प्रत्येक खेळाडूंकडून प्रत्येकी आठशे रुपये घेतले जातात. या शुल्कात शटलचा खर्च संघटनाच करते. शिवाय प्रत्येक खेळाडूच्या मागे शासनाला प्रत्येकी ३०० रुपये दिले जातात. सध्या या प्रशिक्षण वर्गात ६ ते १५ वयोगटातील ६० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.दरम्यान डिसेंबरमध्ये जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी नेहरु स्टेडियमला आकस्मिक भेट दिली असता प्रशिक्षण वर्गात प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू व त्यांच्याकडून शासनाला मिळणाऱ्या शुल्कात बरीच तफावत दिसली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना बॅडमिंटनसह इतरही खेळांचे प्रशिक्षक कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करून त्यांना अत्याधुनिक सोयी व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सूचना केला.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुंड यांनी जिल्हा बॅडमिंटन संघटनेलाच योग्य प्रशिक्षकाचे नाव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सादर करण्याचे पत्र दिले. तसेच एक जानेवारीपासून प्रशिक्षण वर्ग पुढील व्यवस्था होईपर्यंत बंद ठेवण्याची तोंडी सूचना दिली. सध्या एक आठवड्यापासून शालेय बॅडमिंटनपटूंचा सराव बंद पडला आहे.सध्या ज्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. ते तसेच सुरू राहावे, अशी भूमिका खेळाडूंच्या पालकवर्गांनी घेतली आहे. प्रशिक्षणवर्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी पालकांसह प्रशिक्षक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी क्रीडा अधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडली. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व पालक यांची बैठक झाली. पालकांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्याचे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिले. (क्रीडा प्रतिनिधी)
खासगी प्रशिक्षकांना ब्रेक, आता शासकीय नेमणार
By admin | Published: January 10, 2016 2:56 AM