मतदारांचे फोटो अपलोड : मुख्य निवडणूक आयुक्तांकडून कौतुक हरसूल : मतदार यादी शुध्दिकरण मोहीमेत दिग्रस मतदार संघाने जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. मतदार यादीत समाविष्ट संपूर्ण मतदाराचे फोटो अपलोड करण्यात दिग्रस राज्यात अग्रेसर ठरले आहे. दिग्रस विधानसभा मतदार संघातील २ लाख ९२ हजार ४२७ मतदारांपैकी केवळ २५४८ मतदारांचे फोटो समाविष्ट करणे बाकी आहे. मतदार संघातील एकूण मतदार पाहता छायाचित्र नसलेल्या मतदारांची ही आकडेवारी एक टक्यापेक्षाही कमी आहे. त्यातही दिग्रस तालुक्यातील केवळ ६४२ मतदार शिल्लक राहिले आहेत. दिग्रस मधील फोटो अपलोड राहिलेल्या मतदारांमध्ये १८१ शहरी व ४६१ ग्रामीण मतदार आहेत. यासाठी शहरी व ग्रामीण मतदान केंद्रस्तर अधिकारी यांच्या विशेष सभा लावून हे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक मतदार याद्यात १ किंवा दोनच मतदार विना फोटोचे राहिले असून ते गोळा करण्याचे काम तत्परतेने सुरु असल्याची माहिती दिग्रस येथील निवडणूक विभाग प्रमुख नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी दिली. तालुक्यातील बीएलओ यांनी उत्कृष्ट काम करीत दिग्रसला हा गौरव प्राप्त करून दिला असल्याचे तहसीलदार किशोर बागडे म्हणाले. यापुढे तत्परतेने उर्वरीत कामे पूर्ण करून दिग्रस तालुका निवडणूक कार्यात अग्रस्थानी राहील असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला. दिग्रस विधानसभा मतदार संघातील या उत्कृष्ट कामगिरीचा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दखल घेतली असून निवडणूक विभागाचे कौतुक केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही दिग्रसच्या निवडणूक विभागाचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)
मतदारयादी शुद्धीकरणात दिग्रस राज्यात अग्रेसर
By admin | Published: August 18, 2016 1:20 AM