यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यासाठीची भरपाई प्रत्येक जिल्ह्याकडे वळती झाली. मात्र, मदत वाटपाचा निधी जमा करण्यासाठी ११ लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादीच यंत्रणेकडे नाही. तलाठी आणि कृषी विभागाच्या यंत्रणेत इंग्रजी यादी तयार करण्याचा वाद २० दिवसांपासून सुरू आहे. दसरा तोंडावर आला, मात्र वाद सुटला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, अकोेला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. जवळपास २० लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आदेश निघाले. निधी वळता झाल्यानंतर मदतीच्या याद्या तयार करायच्या कोणी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकसानीचे ग्रामस्तरीय समितीने संयुक्त पंचनामे केले. याद्या तयार करण्याचे काम तलाठ्यांवर ढकलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याद्या करण्याचे मूळ काम कृषी विभागाचे आहे. तसा अध्यादेशही आहे. मात्र काम तलाठ्यावर ढकलण्यात आले आहे. त्यांनी इंग्रजी याद्या तयार करण्यास नकार दिला आहे. शेतात पीक नाही, हातात मदतीचा छदाम नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. संकटावर मात करण्याचा आधारही त्यांना मिळालेला नाही.
ग्रामस्तरीय समितीकडे काम द्या
ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायकांनी मिळून नुकसानीचे पंचनामे केले आहे. आता याद्यांचे काम संयुक्त समितीकडे द्यावे अथवा कृषी विभागानेच काम करावे, अशी भूमिका तलाठ्यांनी घेतली आहे. याशिवाय ०.२५ टक्के खर्च निधी तलाठ्यांना देण्याची मागणी करण्यात आली. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
१२ सप्टेंबरपासून संप सुरू आहे. त्यावर तोडगा निघाला नाही. आयुक्तस्तरावर चर्चेेला बोलावले आहे. कृषी विभागाचे काम आमच्यावर थोपवू नये, अशीच भूमिका आहे.
- बाळकृष्ण गाढवे, अध्यक्ष, विभागीय पटवारी संघटना.
जिल्हा - संपावर असलेले तलाठी - कोंडीत सापडलेले शेतकरी
- यवतमाळ - ६४९ - ३,७५,०००
- अमरावती - ५३१- २,००,०००
- अकोला - ३१९- ७६,०२३
- वाशिम - २८८ - २०,०००
- बुलडाणा - ५३९ - ५,०००
- नागपूर- ३३४- १,१४,०००
- वर्धा -२९१-१,७३,०००
- भंडारा- २०४-१२,०००
- गोंदिया -२०३-१,०००
- चंद्रपूर -३०२-१,५९,०००
- गडचिरोली -२३७-२५,०००