लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ऐन इस्टर संडेच्या प्रार्थनेची वेळ हेरुन श्रीलंकेत चर्चमध्ये अतिरेक्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडविले. दीडशे पेक्षा अधिक नागरिकांचा यात बळी गेला. तर तेवढेच जखमी झाले. या अतिरेकी हल्ल्याचा रविवारी यवतमाळातील ख्रिस्ती बांधवांनी शांततापूर्ण निषेध नोंदविला. तर मृतांच्या कुटुंबियांसाठी मातृचर्चमध्ये प्रार्थनाही केली.जगभरात इस्टर संडेची तयारी सुरू असताना रविवारी सकाळी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. इस्टर संडे निमित्त यवतमाळातील फ्री मेथॉडिस्ट मातृचर्चमधून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभू येशूंचा संदेश देत भजने गात शहरातून रॅली काढण्यात आली. मात्र रॅलीनंतर मातृचर्चमध्ये झालेल्या प्रार्थना सभेच्यावेळी श्रीलंकेतील अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी रेव्ह. प्रकाश गद्रे, रेव्ह. फिलमोन डेव्हीड, पास्टर डेव्हीड रायबोर्डे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. कोलंबोमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून अतिरेक्यांचा हा हल्ला निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध यावेळी नोंदविण्यात आला.
श्रीलंकेतील अतिरेकी हल्ल्याचा ख्रिश्चन बांधवांनी नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 9:17 PM