वडगाव रोड : नगरपरिषद निवडणुकीची तयारीयवतमाळ : आगामी चार-सहा महिन्यात होऊ घातलेल्या यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पोलीस आत्तापासूनच तयारीला लागले आहे. त्या तयारीचा भाग म्हणून राजकारणात ‘एन्ट्री’ करू इच्छिणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांच्या तडीपारी कारवाईद्वारे आधीच मुसक्या बांधल्या जाणार आहे. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आहे. लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, भोसा, डोळंबा, वडगाव, मोहा, उमरसरा या ग्रामपंचायत क्षेत्राचा आता शहरात समावेश झाला आहे. या हद्दवाढीनंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढील काही महिन्यात होत आहे. राजकीय पक्ष त्या दृष्टीने कामाला लागले आहे. निवडणुकीत नशीब आजमावण्यास इच्छुक असलेली मंडळीही अचानक नागरिकांच्या संपर्कात आली आहे. विविध प्रसंगांच्या निमित्ताने फ्लेक्सवर झळकणाऱ्या या इच्छुकांच्या छायाचित्रांनी त्यांची सुप्त इच्छा जनतेच्या नजरेतून लपून राहिलेली नाही. गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांनीही नगरपरिषदेमध्ये एन्ट्री मिळविण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहे. कुणी सत्ताधारी पक्षासोबत तर कुणी विरोधी पक्षाचा झेंडा हातात घेताना दिसत आहे. पोलीस दप्तरी त्यांची अट्टल, क्रियाशील, हिस्ट्रीशिटर गुन्हेगार म्हणून नोंद आहे. हे सदस्य राजकारणात सक्रिय झाल्यास आणि लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास त्यांचा उच्छाद आणखी वाढण्याची भीती पोलिसांना आहे. म्हणूनच अशा राजकीय एन्ट्रीसाठी आतूर गुन्हेगारांच्या आत्तापासूनच मुसक्या आवळण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाणे आपल्या हद्दीतील अशा गुन्हेगारांची कुंडली बनवित आहे. त्यांना कायद्यातील विविध कलमांचा आधार घेऊन निवडणूक काळात शहरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. वडगाव रोड पोलिसांनी सध्या अशा आठ क्रियाशील गुंडांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. निवडणूक काळात त्यांना यवतमाळ व लगतच्या तालुक्यांमधून हद्दपार करण्याची व्युहरचना आहे. हे प्रस्ताव वडगाव रोडकडून छाननीसाठी एसडीपीओंकडे व परवानगीसाठी एसपींकडे पाठविले जातील. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांमार्फत या प्रस्तावांवर निर्णय घेतला जाईल. आठवडीबाजार, संकटमोचन, पवारपुरा या भागातील हे सदस्य असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. पोलिसांचा वॉच असतोच मात्र आता हे सदस्य फ्लेक्सवर शुभेच्छा देताना झळकू लागल्याने पोलिसांच्या आणखी निशाण्यावर आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ‘पैसा कमविणे’ हेच टार्गेटयवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांनी सध्या ‘पैसा कमविणे’ एवढेच टार्गेट ठेवले आहे. सध्या त्यांना कुण्याही भानगडीत पडायचे नाही. नगर परिषदेची निवडणूक होईस्तोवर पोलीस कारवाईत अडकायचे नाही, असे या सदस्यांनी ठरविले आहे. त्यामुळेच शहरातील चाकूहल्ले नियंत्रणात आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील सर्व सदस्यांनी झटपट पैसा कमविण्यावर भर दिला आहे. त्यात सध्या त्यांना दारू तस्करीतून सर्वाधिक पैसा मिळतो आहे. वर्धे पाठोपाठ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने या पैसे कमाविणाऱ्यांची आयतीच सोय झाली आहे. दारूच्या खेपा चोरट्या मार्गाने चंद्रपुरात, वर्धेत पोहोचवून हे सदस्य पाण्यासारखा पैसा कमवित आहे. याच पैशावर ते नगरपरिषद निवडणुकीत आपले नशीब आजमाविणार आहे. गुन्हेगारी वर्तुळात खेळणारा हा पैसा रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अन्यथा हाच पैसा निवडणुकीत पोलिसांची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.
आठ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव
By admin | Published: April 16, 2016 2:03 AM