अक्षय राठोड टोळी : तीन फरार सदस्यांचा शोध कायम
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विविध गुन्हे शिरावर असलेल्या अक्षय राठोड टोळीच्या नऊ सदस्यांवर मोक्कांतर्गत स्थानबद्धता कारवाईचा प्रस्ताव अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांच्याकडे परवानगीसाठी दाखल करण्यात आला आहे. अक्षय राठोड टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावण्याची तयारी जिल्हा पोलीस दलात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. अखेर मोक्काचा हा प्रस्ताव तयार करून यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्यामार्फत सोमवारी पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला आहे. त्यांच्या स्तरावरून आता या प्रस्तावाची छाननी केली जाईल. या प्रस्तावात त्रुट्या आहेत का हे तपासले जाईल. वेळप्रसंगी एसडीपीओ जगताप यांनासुद्धा महानिरीक्षक कार्यालयात पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. अक्षय राठोड टोळीच्या नऊ सदस्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईचा हा प्रस्ताव आहे. त्यात टोळी प्रमुख स्वत: अक्षय आत्माराम राठोड, शुभम हरिप्रसाद बघेल, आशिष उर्फ भकीरा दांडेकर, अनिकेत गावंडे, प्रकाश निंबाळकर, गौरव अढाव, अक्षय बगमारे, करण परोपटे, रोशन उर्फ लॅपटॉप गोळे यांचा समावेश आहे. या सर्वांवर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात चांदोरेनगर येथील सचिन किसन मांगुळकर यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०७, ३९७, ३६४ अ, ३६५, १२० ब आणि ३/२५ आर्म्स अॅक्ट अन्यवे गुन्हा दाखल आहे. रेती घाटातील पैसे आणि गाडीच्या वादातून हा गुन्हा घडला होता. यातील अक्षय, शुभम व आशिष अद्याप फरार आहे. अक्षयसह या तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी जीवाचे रान चालविले आहे. पोलिसांच्या प्रमुख तपास यंत्रणांचा संपूर्ण फोकस अक्षयवर आहे. कारण त्याची अटक सत्ताधारी राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच संपूर्ण पोलीस यंत्रणा अक्षयचे लोकेशन शोधण्यात व्यस्त आहे. मात्र अद्याप तरी त्यांना यश आलेले नाही. त्याच्या अटकेत असलेल्या साथीदारांना अधिकाधिक काळ मोक्काअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अक्षयवर एक डझनापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. अन्य सदस्यांवरही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांकडून सापत्न वागणूक गुन्हेगारी कोणत्याही टोळीचा असो अथवा कोणत्याही गुन्ह्यातील, त्याला पोलिसांकडून सारखीच ‘ट्रिटमेंट’ मिळणे अपेक्षित आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचे चित्र आहे. सत्तेची हवा पाहून ही वागणूक बदलविली जाते. प्रवीण दिवटेच्या खुनातील आरोपींविरुद्धसुद्धा मोक्काचा प्रस्ताव पाठविला गेला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळला जावा, अशा पद्धतीने त्यात त्रुट्या ठेवण्यात आल्या होत्या. सोबतीला यवतमाळातून थेट महानिरीक्षक कार्यालयापर्यंत राजकीय संधान बांधले गेले होते. त्यामुळे अपेक्षेनुसार मोक्काचा प्रस्ताव नाकारला गेला. आता मात्र या उलट स्थिती पहायला मिळत आहे. अक्षय राठोड टोळीवर कोणत्याही परिस्थितीत मोक्का लावाच, ही टोळी अधिकाधिक काळ कारागृहात रहावी, अशी राजकीय इच्छा असल्याने पोलिसांकडून या टोळीविरोधातील मोक्काचा प्रस्ताव प्रचंड अभ्यासपूर्ण बनविण्यात आला आहे. त्यात एकही त्रुटी राहणार नाही, आणि प्रस्ताव फेटाळला जाणार नाही याची खास खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यावरून सत्तेची हवा आणि टोळीचे चेहरे पाहून पोलिसांची ‘ट्रीटमेंट’ बदलत असल्याचे दिसून येते. या बातमीनंतर सारवासारव करण्यासाठी एखादवेळी महानिरीक्षक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक केवळ देखाव्यासाठी एखाद दोन त्रुट्या काढल्या जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.