३२ कोटींचे बजेट : सुलभ दर्शनासोबतच निसर्ग सौंदर्याचा आनंदही लुटता येणार खुशाल खंदारे धनोडा देवीच्या साडेतीन शक्तीपिठापैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुका माता गड आणि विविध देवस्थानांवर रोप-वे आणि केबल कारचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रोप-वेसाठी ३२ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासह परिसराचे निसर्ग सौंदर्य न्याहाळने सुलभ जाणार आहे. सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांवर रेणुका माता मंदिर, दत्त शिखर, अनसूया माता मंदिर, रामगड किल्ला, महाकाली मंदिर, वनदेव देवस्थान यासह विविध तीर्थक्षेत्र आहेत. गडावर दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येतात. एकट्या नवरात्रीत १० लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. यामध्ये वृद्ध आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. माहूर बसस्थानक ते रेणुकादेवी मंदिर चार किमी, दत्त मंदिर चार किमी आणि अनसूया माता मंदिर तीन किमी अंतर आहे. हा रस्ता पूर्णत: डोंगरातून असून जीवघेण्या वळणाहून भाविक आपली वाहने घेवून जातात, तर रेणुकामाता मंदिरावर जाण्यासाठी २३० पायऱ्या चढाव्या लागतात. अनसूया माता मंदिरावर २५० पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून चढ-उतार करताना भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळेच येथे रोप-वे किंवा केबल कारचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी पुढे आली. संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्हव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशावरून त्यांचे निजी सचिव वैभव डांगे यांनी राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यात रोप-वेचा प्रस्ताव पाठविण्याचे सूचविले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राऊलवाड यांच्याकडून प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय सडक व परिवहन मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. असा राहील रोप-वे माहूर संस्थानने तयार केलेल्या प्रस्तावानुसार रोप-वे शहरातील निसर्गरम्य परिसरातील मातृतीर्थ कुंडाजवळ सुरू होईल. टीएसपी सेंटरपासून रेणुका मंदिरावर जाईल. तेथून थेट दत्तशिखर मंदिराचे प्रवेशद्वार तेथून अनसूया माता प्रवेशद्वाराजवळ जाणार आहे. पर्यटकांना आणि भाविकांना उंचावरून सह्याद्रीच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे.
माहूर गडावर रोप-वे, केबल कारचा प्रस्ताव
By admin | Published: August 18, 2016 1:14 AM