शासनाकडे अहवाल : नेर, दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसदसह शेंबाळपिंपरी, काळी दौ.चा समावेशसुरेंद्र राऊत यवतमाळभौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या यवतमाळ जिल्हा विभाजनाचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये प्रस्तावित पुसद जिल्हा हा आठ तालुक्यांचा असून त्यासाठी नवीन दोन तालुक्यांची निर्मिती केली जाणार आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून जिल्ह्याचे विभाजन अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे. वाढलेली लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र एकंदर कारभारासाठी अडचणीचे ठरत असल्याने सर्वांगीण असा अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित पुसद जिल्ह्यामध्ये एकूण १२ लाख ५६ हजार २५२ इतक्या लोकसंख्येचा समावेश राहणार असून पुसद, उमरखेड, महागाव या सोबतच नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यांचाही त्यात समावेश केला जाणार आहे. शिवाय पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी आणि काळी दौ. हे दोन नवीन तालुके तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. पुसद तालुक्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने केली जात आहे. २०१० मध्ये राज्य शासनाने जिल्हा विभाजनाबाबत एक समिती स्थापन केली आहे. मंत्रिमंडळस्तरावर असलेल्या या समितीत महसूल विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष आहेत. या समितीकडून सर्वच जिल्हा प्रशासनाला जिल्हा विभाजनाबाबत अहवाल मागविण्यात आला होता. त्यात २५ मुद्यांच्या आधारे माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे.यवतमाळ जिल्ह्याची १९०५ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले नाही. बदलत्या परिस्थितीत जिल्ह्याच्या विभाजनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हा विभाजन करताना लोकसंख्या, भौगोलिक रचना, वहितीतील जमिनीचे क्षेत्र, वन जमीन, तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर, ऐतिहासिक पार्श्वभूमी, दळण-वळणाची साधने, कार्यालयीन इमारतींची उपलब्धता याचा सारासार विचार करण्यात आला आहे. शिवाय विभाजीत होणाऱ्या जिल्ह्यातील बोलीभाषा वास्तव्यास असलेल्या जाती, जमाती, संस्कृती यावरही भर देण्यात आला आहे. याच आधारावर यवतमाळ जिल्ह्यामधून पुसद जिल्ह्याची निर्मिती केल्यास दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद या बंजाराबहुल तालुक्यांना एकत्र करणे सहज शक्य होईल. त्यासाठी बोलीभाषा सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक हे महत्त्वाचा घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवीन जिल्हा निर्माण करताना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालय हे तीन कार्यालय आवश्यक आहेत. विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यालयासंदर्भात विभागाचे अभिप्राय घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या या कार्यालयांचे आवश्यकतेप्रमाणे बळकटीकरण करण्याचा अभिप्रायही देण्यात आला आहे. आज यवतमाळ जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार १९२ हेक्टर ६३ आर इतकी वनजमीन आहे. नव्याने प्रस्तावित असलेल्या पुसद जिल्ह्यातील विभागांच्या कार्यालयीन इमारतीसाठी ९३ हजार ६४४ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या शिवाय आकृतिबंधानुसार अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता, जिल्ह्यांतर्गत दळणवळणाची व्यवस्था, जिल्हा रुग्णालयाची सुविधा, शासकीय निवासगृहे, विश्रामगृहे यांचाही सारासार विचार करण्यात आला आहे. नवीन जिल्ह्यासाठी इमारतींवर ३६ कोटी, निवासावर खर्च १०४ कोटी ४७ लाख, वाहनांसाठी ३० कोटी दोन लाख, मंजूर आकृतिबंधानुसार येथे सहा हजार ९४४ कर्मचारी, पदनिर्मितीसाठी ३९ कोटी २० लाख खर्च, अनावर्ती खर्च १८८ कोटी ४१ लाख इतका अपेक्षित आहे. पुसद जिल्हा निर्मितीचा मुहूर्त कधी ठरतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विभाजनानंतर जिल्ह्याची स्थितीयवतमाळ जिल्ह्याचे विभाजन केल्यानंतर भौगोलिक लोकसंख्या आणि लागवडीखालील क्षेत्राची विभागणी होणार आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या पुसद जिल्ह्याची १२ लाख ५६ हजार २५२ एवढी लोकसंख्या राहणार आहे. या जिल्ह्याचे ५ लाख ५४ हजार ११४ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळ राहणार आहे. त्यापैकी ३ लाख ६२ हजार ४३ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. विभाजनानंतर यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाख २६ हजार ९६ इतकी होणार आहे. यात भौगोलिक क्षेत्रफळ आठ लाख ५ हजार ८१२ हेक्टर राहणार आहे. वहितीखालील क्षेत्र ५ लाख ३१ हजार ६०९ हेक्टर राहणार आहे. असे राहणार तालुकेप्रस्तावित पुसद जिल्ह्यात ४२ कि.मी. अंतरावर उमरखेड, ३२ कि.मी. अंतरावर महागाव, ३२ कि.मी. अंतरावर दिग्रस, ६० कि.मी. अंतरावर दारव्हा, ९५ कि.मी. अंतरावर नेर तालुका राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात २२ कि.मी. अंतरावर बाभूळगाव, २३ कि.मी. अंतरावर कळंब, ४२ कि.मी. अंतरावर आर्णी, ६० कि.मी. अंतरावर केळापूर, ३५ कि.मी. अंतरावर घाटंजी, ५४ कि.मी. अंतरावर राळेगाव, १०५ कि.मी. अंतरावर वणी, १०० कि.मी. अंतरावर मारेगाव, ९० कि.मी. अंतरावर झरीजामणी तालुका राहणार आहे.
प्रस्तावित पुसद जिल्ह्यात आठ तालुके
By admin | Published: November 30, 2015 2:10 AM