पुसद : शहरातील लॉजिंगला कुंटणखान्याचे स्वरूप आले आहे. महिला, गरजू युवतींना वाममार्गाला लावून या रॅकेटमध्ये ओढले जात आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हे अर्थचक्र चालक, मालक व त्यांना वरदहस्त देणाऱ्या अधिकाऱ्यांना सुखावणारे असले, तरी यातून अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी होत आहे.
बस स्टँड परिसर, शिवाजी चौक परिसर अवैध धंद्यांचे आगार बनले आहे. सर्व सोयींनीयुक्त असलेल्या या भागात वाहनचालक व इतर प्रवाशांसाठी बहुतांश लॉजिंग-बोर्डिंग सज्ज आहे. कालांतराने कुंटणखाना चालवण्याकडेच अनेक लॉजिंग-बोर्डिंगनी मोर्चा वळविला आहे. या व्यवसायातून अफाट पैसा मिळत असल्याने अनेकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून आलिशान लॉजिंग उभारले आहे. या लॉजिंगमध्ये नेमके कोणते उद्योग चालतात, याची पुसटशीही कल्पनाही येत नाही. परंतु आंबटशौकिनांना या उद्योगाची पुरेपूर माहिती आहे.
बाहेरून ‘कॉलगर्ल’ मागवून त्यांना प्रवासी म्हणून दाखवणे आणि या व्यवसायातून उखळ पांढरे करून घेणे, असाच उद्योग काही हॉटेल व्यावसायिकांनी चालविला आहे. अशा लॉजेसवर ‘पाखरू’ पाठवण्यासाठी शहरातील काही ‘हस्तक’ गिऱ्हाईकांची खात्री पटल्यानंतर मोबाईलवरच युवतींचे दिमाखदार फोटो पाठवून निवड करण्याची सूचना करतात. गिऱ्हाईकाच्या निवडीनंतर संबंधित युवतीला संबंधित लॉजवर पाठविले जाते. हायप्रोफाइल ते घरगुती महिला मिळवून देणारा ‘माणूस’ म्हणून ‘त्याची’ चांगलीच ओळख आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत अंदाजे १६ ते २८ वयोगटातील युवती तोंडावर रुमाल बांधून सरार्सपणे थेट लॉजकडे जातात. त्यांना कोणी दुचाकीने आणून सोडतात. काही ऑटोरिक्षामधून येतात. यात काही अल्पवयीन मुलीसुध्दा असतात. त्यामुळे आंबटशौकिनांची मोठी गर्दी असते.
हा गोरखधंदा बिनधोक चालला आहे. यासाठी अधिकाऱ्यांना दरमहा घसघशीत ‘दाम’ मिळत असल्याची उघड चर्चा आहे. नेहमी ‘साध्या वेषात’ वावरणाऱ्या पोलिसाची ‘त्याच्या’शी चांगलीच लगट आहे. त्यामुळे कमाई वरपर्यंत पोहोचविणे सोपे झाले आहे. काही वर्षांपूर्वी विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली होती, हे विशेष.
शासनाने लॉजिंग चालविण्यासाठी नियम घालून दिले. लॉजचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे. लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख रजिस्टरमध्ये आवश्यक असतो. मात्र, असे कोणतेही नियम पाळले जात नाही. त्यामुळे या लॉजेसमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार यापूर्वी अनेकदा झाली. परंतु त्यापासून कोणताही बोध घेतला जात नाही. अशा लॉजेसचा वापर करून प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योगही काही टोळ्यांनी चालविला आहे. अशा टोळ्यांनाही भरभक्कम कमाईचा मार्ग मिळाला आहे.
बॉक्स
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरात जागोजागी लॉज उभे आहेत. राहण्याची उत्तम सोय, अतिथिगृह अशा गोंडस नावाखाली चालणाऱ्या लॉजमधून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असतो. यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊन शहराची बदनामी होत आहे.
बॉक्स
अनेक घरांमध्येही छुपा व्यवसाय
शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यातील काही घरांमध्ये छुपा देहव्यापार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविद्यालयीन तरुणी, गृहिणी यांचा त्यात सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. शहराच्या नैतिकतेच्या दृष्टीने ही बाब हितकारक नसल्याने त्यावरही कारवाईची अपेक्षा आहे.
कोट