यवतमाळ : सामाजिक व आर्थिक अडचणीत असलेल्या महिला-मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जाताे. अशा प्रकाराचा कुंटणखाना दारव्हा मार्गावरील मैथिलीनगर येथे अनेक दिवसांपासून सुरू हाेता. सनराईज स्कूलसमाेर हा कुंटणखाना चालविला जात हाेता. येथे बनावट ग्राहक पाठवून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकली. महिलेस एका ग्राहकाला रंगेहाथ अटक केली. तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
सविता (३९) नाव बदलेले, ही ग्रामीण भागातील महिला-मुलींना देहव्यापारास प्रवृत्त करते, असा संशय हाेता. त्यावरूनच बुधवारी डमी ग्राहक येथे पाठविण्यात आला. सविताने पैसे घेऊन महिलेसाेबत एका खाेलीत पाठविले. दबा धरून असलेल्या पाेलिस पथकाने इशारा मिळताच धाड टाकली. डमी ग्राहकाने दिलेले पैसे सविताकडे आढळून आले. तसेच तिच्यासाेबत ग्राहक सचिन अशाेकराव कावरे (३५, रा. साईनगर, पिंपळगाव) हा हाती लागला. या कारवाईत पाेलिसांनी राेख १ हजार २०० रुपये, दोन माेबाइल, दुचाकी असा एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. ही कारवाई पाेलिस अधीक्षक डाॅ. पवन बनसाेड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख आधारसिंग साेनाेने यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक धनराज हाके, जमादार बंडू डांगे, सैय्यद साजीद, रूपेश पाली, राहुल गाेरे, ऋतुराज मेडवे, अरुणा भाेयर, ममता देवतळे यांनी केली.
दाेन्ही आराेपींना अटक करून लाेहार पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी दाेघांवरही महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.