युती सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:02 PM2019-07-12T22:02:35+5:302019-07-12T22:03:52+5:30
राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुराव्यासह भ्रष्टाचार पुढे आणलेला असताना संबंधितांना क्लिन चिट दिली जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या मालाडमध्ये सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली भिंत कोसळली. यात २७ जणांचे बळी गेले. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांना जलसमाधी मिळाली. या घटनांना जबाबदार लोकांवर कारवाईसाठी सरकारकडून कमालीची निष्क्रियता दाखविली जात आहे. पीककर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. परिणामी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभरात एकूण उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. याकडे सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्यात आला. परिणामी प्रती लिटर अडीच रुपयांनी वाढ झाली. हा प्रकार ग्राहकांवर मोठा अन्याय आहे. वाढलेल्या किमती तातडीने मागे घ्याव्या, अशी मागणी आहे. या सर्व बाबी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले.