लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली होती. त्याला आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही. यासह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. तसेच दिवसभर काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वेतनत्रुटी दूर करणे, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती स्तर कमी करण्याविषयी अभ्यास करण्यासाठी गठित समितीच्या अहवालावर संघटनेसोबत चर्चा करून निर्णय घेणे, सुधारीत कर्मचारी आकृतिबंध मंजुरीबाबत संघटनेने आपले म्हणणे सादर केले असून त्यानुसार निर्णय घ्यावा, निवृत्ती वेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम ११ वर्षांनी पुनर्स्थापित करावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मागणीनुसार कुटुंब निवृत्ती वेतन व उपदान याबाबत निर्णय घ्यावा, जिल्हा परिषदेत सर्व संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, परिचर व वाहन चालक या दोन संवर्गाच्या सेवा भरती नियमात अंतिमतः दुरुस्ती करून रिक्त पदे भरावी, आदी मागण्यांसाठी आज काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुडमेथे, संजय गावंडे, सुरेश चव्हाण, संदीप शिवरामवार, संतोष मिश्रा, संदीप भोयर, सचिन पानोडे, तेजस तिवारी, सचिन चव्हाण, शशिकांत चिद्दरवार, प्रवीण टेके, रवी सरडे, प्रमोद थूल, संजय पवार, नीलेश पाटील, शिल्पा मेश्राम, रेखा धुर्वे, वर्षा काबंळे, कमल तोडसाम, अनिल पवार, संदीप तम्मेवार, विवेक भुसारी, गजानन कोटनाके यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांत नाराजीदुसऱ्या टप्प्यात ९ ऑगस्टला दुपारच्या भोजन कालावधीत जिल्हा परिषद कर्मचारी निदर्शने करणार आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आता कर्मचारी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.