पालकमंत्री : उत्कृष्ट सुविधांवर भर, अभयारण्यात राहण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य नैसर्गिक संपदेने नटलेले एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करावा, यासाठी संपूर्ण मदत देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. येथील विश्रामगृह येथे टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन विकासाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी दीपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जंगल सफारी आणि व्याघ्र पर्यटनासाठी राज्यभरातील नागरिक आता टिपेश्वरचे नाव घेऊ लागले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हे अभयारण्य आहे. त्यामुळे याठिकाणी पोहोचण्याचा प्रश्न नाही. मात्र याठिकाणी पर्यटकांना राहण्याची चांगली व्यवस्था नाही. परिणामी केवळ दिवसा पर्यटन करण्यावर पर्यटक भर देत आहे. याठिकाणी चांगल्या दर्जाची राहण्याची व्यवस्था झाल्यास अनेक पर्यटक याकडे आकृष्ट होतील. टिपेश्वर लगतच्या परिसराचा विकास करण्यासाठी खासगी व्यक्तींनी पुढाकार घेतला असताना शासनाने आता मागे राहू नये. प्रामुख्याने पावसाळ्यात वनवैभव चांगल्या स्थितीत असते. मात्र या काळात जंगल सफारी करणे दुरापास्त असल्याने येत्या काळात सफारीसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते उभारावे लागतील. यासाठी वन विभागाने विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. व्याघ्र दर्शनासाठी टिपेश्वर हे एक चांगले ठिकाण आहे. गेल्या फेब्रुवारी ते जून महिन्याच्या दरम्यान आलेल्या सुमारे ९० टक्के पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. राज्यातील इतर अभयारण्यापेक्षा याठिकाणी सुलभरित्या वाघाचे दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ घातली आहे. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. टिपेश्वर अभयारण्यामुळे केवळ एका तालुक्याचा विकास होणार नसून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात या अभयारण्याचे मोठे योगदान राहणार आहे. कोणतीही सुविधा न देता याठिकाणी पर्यटकांचा ओढा कायम आहे. पर्यटक याठिकाणी यावेत, यासाठी सुविधा निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या विकासास हातभार लागण्यास निश्चितच मदत होणा आहे. त्यामुळे वेळ पडल्यास टिपेश्वरच्या विकासासाठी जिल्हा नियोजन निधीमध्ये विशेष तरतूद करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
टिपेश्वर अभयारण्यासाठी निधीची तरतूद करणार
By admin | Published: August 01, 2016 1:11 AM