उमरखेड : सध्या कोरोना संक्रमणाच्या स्थितीत आरोग्य सेवेवर विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. राज्यातील नागरिकांना सुदृढ आरोग्य सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी एमपीजे संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत सुविधांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे औषधींचा काळाबाजार होत आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. जनता संभ्रमित आहे. त्यामुळे मुव्हमेन्ट फॉर पीस अँड जस्टीस (एमपीजे) ने सामान्य जनतेला कोरोनाकाळात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
नागरिकांना योग्य व उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटरची स्थापना करावी. सरकारी, खासगी आणि धर्मादाय ट्रस्ट, सेवाभावी विश्वस्त संस्थांद्वारे संचालित सर्व रुग्णालयांमध्ये कोविड सेंटरसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तथा अन्य सुविधांची माहिती ऑनलाईन व ऑफलाईन देण्याची व्यवस्था करावी. खासगी व धर्मादाय ट्रस्ट, सेवाभावी संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड उपचारासाठी प्रवेशद्वारावर दरपत्रक लावण्याची सक्ती करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. १०८ रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता मागणीनुसार करावी, खासगी रुग्णवाहिकेसाठी दर निश्चित करावा, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत कोविडवर मोफत उपचाराची व्यवस्था करावी, सर्व रुग्णालयांमधील कोविडच्या उपचारात पारदर्शकता येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्या, अशीही मागणी करण्यात आली.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना डॉ. फारूक अबरार, इरफान शेख, मिनाज अहमद, तसलीम अहमद आदी उपस्थित होते.