वैदर्भीय अधिकाऱ्यांची एकजूट : बाहेरील अधिकाऱ्यांना शह देण्याची तयारी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे आता जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये प्रांतिक गटबाजी दिसू लागली आहे. विदर्भाबाहेरील अधिकारी येथे हावी होत असल्याचे पाहून वैदर्भीय पोलीस अधिकाऱ्यांनीही एकजूट केल्याची माहिती पोलीस वर्तुळातून पुढे आली आहे. राज्यात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दक्षिण, उत्तर, मध्य अशा लॉबी असतात. उघड त्याचे प्रदर्शन कुठेही दिसत नसले तरी छुपा अजेंडा मात्र राबविला जातो. जणू त्याच धर्तीवर आता राज्य सेवेतील अधिकाऱ्यांमध्येही वेगवेगळ्या लॉबी तयार झाल्या आहेत. त्याचा अनुभव जिल्हा पोलीस दलात येतो आहे. पोलीस वर्तुळातील चर्चेनुसार, जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वैदर्भीय आणि नॉन-वैदर्भीय असे दोन गट पडले आहेत. वैदर्भीय अधिकाऱ्यांना एकापाठोपाठ दूर करून नॉन-वैदर्भीय अधिकारी हावी होत असल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा येथून बदलून आलेले पोलीस अधिकारी महत्वाच्या पदांवर कब्जा करीत आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांना एक तर साईड ब्रँच किंवा डोकेदुखीच्या ठिकाणी ठाणेदारकी दिली जात आहे. सत्ताधीशांच्या पाठबळामुळे नॉन-वैदर्भीय लॉबी यवतमाळ जिल्ह्यात ‘बाजीगर’ बनली आहे. या लॉबीला शह देण्यासाठी आता वैदर्भीय अधिकाऱ्यांनीही एकजूट केल्याचे सांगण्यात येते. वैदर्भीय अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या नजरेत उघडे पाडण्यासाठी बाहेरील लॉबी सतत संधीच्या शोधात असते. संधीची अशीच प्रतीक्षा राहिल्यास आगामी सण-उत्सवात वैदर्भीय अधिकाऱ्यांना अडचणीत आणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लॉबीची सूत्रे हाती असलेल्या तरुण अधिकाऱ्याच्या दंगल व एका खून प्रकरणातील तक्रारींची फाईल मात्र चौकशी ऐवजी बंद करून ठेवण्यात आली आहे. राजकीय वरदहस्तामुळे ती फाईल उघडण्याची चिन्हे नाहीत. भविष्यातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता दंडाधिकारी स्तरावरून पोलीस दलातील ही प्रांतिक गटबाजी मिटविण्याचे प्रयत्न होतात का हे पाहणे महत्वाचे ठरते.
जिल्हा पोलीस दलात प्रांतिक गटबाजी
By admin | Published: June 28, 2017 12:27 AM