पालकमंत्री : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनयवतमाळ : आरोग्य सेवा ही इतर कोणत्याही सेवेपेक्षा महत्त्वाची आहे. ही सेवा चांगल्या प्रकारे मिळावी. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या नवीन इमारतीमुळे या सेवेस गती मिळेल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मदन येरावार होेते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिभाऊ राठोड, नगराध्यक्ष सुभाष राय, आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, बांधकामचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ. भगत उपस्थित होते. पोस्टल मैदानालगत जुन्या स्त्री रूग्णालयाच्या परिसरात १ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून ही सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा आकृतिबंध व कर्मचारी मंजूर नसल्याने कामात अडथळा होता. ही बाब लक्षात घेता सदर आकृतिबंध येत्या मार्च अखेर मंजुरीसाठी प्रयत्न करू. आरोग्य सेवेत जिल्ह्यात काहीच कमतरता राहणार नाही, यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यवतमाळात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल लवकरच होणार आहे. शासनाने यासाठी हमी घेतल्याने या हॉस्पिटलच्या कामास गती येणार आहे. उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये अपंग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. तसेच जिल्ह्यातील सर्व रूग्णालये सीसीटीव्ही व संगणकीकरण करण्यावर आपला भर असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.आमदार येरावार यांनी नवीन इमारतीच्या माध्यमातून रूग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे सांगितले. आरोग्य उपसंचालक डॉ.लव्हाळे यांचेही याप्रसंगी भाषण झाले. जिल्हा शल्यचिकित्सह डॉ.धोटे यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले, डॉ. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता पी. व्ही. गावंडे, डॉ.मनोज सक्तेपार, डॉ. पांडे उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
जनतेस चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे
By admin | Published: December 27, 2015 2:49 AM