लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : कोलकता, कळवा, बदलापूर, पुणे येथे महिला आणि मुलींवर अत्याचार करण्यात आले. या आरोपींना तत्काळ शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी महिला सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोलकाता येथे झालेल्या निवासी महिला डॉक्टर वरील अत्याचाराची घटना घडली. लागोपाठ बदलापूर, कळवा, पुणे, अकोला येथे देखील शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घडलेल्या घडल्या आहेत. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लावणारी आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई होत नसल्याने अशी प्रकरणे वाढीस लागलेली आहेत. त्यामुळे दृष्कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव अशा घोषणा दिल्या जातात. पण राज्यातील मुली, महिला सुरक्षित नसतील तर सगळ्या घोषणा निरर्थक, घोषवाक्यापुरतेच मर्यादित ठरत आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. कांचन नरवडे, माळी समाज महिला संघटना अध्यक्षा सुनीता शेंदुरकर, अहिल्याबाई होळकर संघटनेच्या अध्यक्ष प्रा. अवंती राऊत, तेली समाज संघटना छाया गुल्हाने, बंजारा समाज संघटना अध्यक्ष डॉ. लीना राठोड, स्मार्ट सखी मंच अध्यक्षा सुनीता अग्रवाल, विहार महिला समिती अध्यक्षा पुष्पा मनवर, रजनी खिराडे, मारवाडी महिला संमेलन राष्ट्रीय सचिव संध्या साबू, दारव्हा शाखा अध्यक्ष कल्पना बागरेचा, सर्व शाखेय कुणबी समाज महिला संघटना अध्यक्ष डॉ. संगीता घुईखेडकर यांच्यासह वंदना जाधव, नलिनी ठाकरे, अश्विनी शेळके, एस.एस.गावंडे, व्ही.ए. कुमरे, मनिषा गावंडे, हेमा निकम, हर्षा खोडे, योगिता राठोड, अरुणा पासले, डॉ. कोमल चर्हाटे आदींची उपस्थिती होती.