ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये धनगर समाजबांधवांनी स्वखर्चाने तैलचित्र उभारून अहिल्याबाई होळकर असे चौकाचे नामकरण केले. मात्र, हा चौक अद्याप सौंदर्यीकरणापसून वंचित आहे.
या प्रभागाच्या नगरसेवकाने उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. शहरातील काही चौकातील महापुरुषांच्या तैलचित्रांचे सुशोभिकरण, रंगरंगोटी तसेच विविध चौकातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. परंतु राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राकडे व त्या चौकाकडे नगरपंचायत प्रशासनासह संबंधित लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
आता अवघ्या चार दिवसांवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येऊन ठेपली आहे. यानिमित्त चौकाची किमान स्वच्छता तरी राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ज्या राजमातेने इतिहास रचला, पती निधनानंतर कुशल प्रशासक म्हणून राजकीय वारसा सांभाळला, त्यांच्या हातून विविध मंदिराचे जीर्णोद्धार झाले, शाळा, बारव, विहिरी यासारख्या समाजोपयोगी कामांना कुशल प्रशासक म्हणून न्याय दिला, त्याच राजमातेचे तैलचित्र व चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे खंत व्यक्त केली जात आहे.