लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेने समाजातील दात्यांना आवाहन करून ‘एक टॅँकर माझ्या नावाने’ या उपक्रमाची सुरुवात केली. याला शहरातील आणि विदेशात स्थिरावलेल्या समाजबांधवांनी सढळ हाताने मदत केली. यातून गरीब वस्तीमध्ये दिवसाला चार हजार लिटर शुद्ध पाणी वितरित केले जात आहे.हा उपक्रम सुरू करण्यासाठी सुरुवातील अकादमीच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी दिली. या उपक्रमातील सेवाभाव पाहून अनेकांनी स्वेच्छेने शक्य होईल ती रक्कम या कामात दिली. अकादमी व ‘नाग’ संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनीसुद्धा देणगी दात्याच्या नावे टॅँकरवर बॅनर लावून पाणी वाटप सुरू केले. रोजमजुरीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडणाऱ्यांना टंचाईत शाश्वत पुरवठा केला जात आहे. पाटीपुरा, सम्राट अशोक चौक ते आंबेडकर चौक वस्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, नेताजीनगर या भागात रोटेशन पद्धतीने शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे.हा उपक्रम आनंद गायकवाड, गोपींचद कांबळे, कवडूजी नगराळे, डॉ.सुभाष जमधाडे, डॉ.साहेबराव कदम, प्रा.अॅड.संदीप नगराळे, अभियंता संजय मानकर, संजय ढोले यांच्यासह ‘नाग’ संघटनेचे रितेश मून, राहुल बनसोड, मंगला जाधव, शोभा हनवते, भारत थुल निस्वार्थ भावनेने राबवित आहेत. आनंद गायाकवाड व मालती गायकवाड या दाम्पत्यांनी तर पाणी वाटपाच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.
‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:11 PM
शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देदिलासा : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, ‘नाग’चा उपक्रम