संततधार पाऊस : पुसदकरांच्या पाण्याचा प्रश्न निकाली पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण बुधवारी दुपारी ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे पुसद शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. ओव्हर फ्लो झालेले धरण पाहण्यासाठी पुसदकरांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे. पुसद परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने अवघ्या पाच दिवसात या धरणाचा जलसाठा ३५ टक्क्याने वाढला आहे. पुसद शहराला पाणीपुरवठा करणारे पूस धरण गत उन्हाळ्यात तळाला लागले होते. केवळ एक टक्काच पाणी शिल्लक होते. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मात्र यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी रात्री सारखा पाऊस कोसळल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली. पूस धरण ८५ टक्के भरले होते. बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले, अशी माहिती शाखा अभियंता आशिष तळवकर यांनी दिली आणि पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने पुसदकरांना आता नियमित पाणीपुरवठा होण्याचे संकेत आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत ७६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत उन्हाळ्यात धरण आटल्याने पुसदकरांना चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. आता पूस धरण तुडूंब भरल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र आता सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
पूस धरण झाले ‘ओव्हर फ्लो’
By admin | Published: August 04, 2016 1:11 AM