यवतमाळ - विनयभंगाच्या आरोपीचा पुसद शहर ठाणेदाराने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ठाण्यातून उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार अनिलसिंंह गौतम यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) सोपविल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुसद येथील आंबेडकर वार्डातील भीमा तुकाराम हाटे याच्या मृत्यूनंतर पुसदमध्ये तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी दगडफेक झाली. त्याचा मृतदेह पुसद शहरात दाखल होताच नातेवाईकांनी तो शहर ठाण्याच्या प्रवेशव्दारावर ठेवला. ठाणेदारावर कठोर कारवाईचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पुसद गाठून या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या चौकशी अहवालावरून ठाणेदार अनिलसिंह गौतम यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तूर्तास याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. ठाणेदाराच्या निलंबनाचा आदेश व तपास सीआयडीकडे देण्यात आल्याच्या आदेशाची प्रत घेतल्यानंतर भीमा हाटे याच्या नातेवाईकांनी त्याचे पार्थिव उचलून त्यावर अत्यंसंस्कार केले. शुक्रवारी रात्रीपासून पुसद शहर ठाणे परिसरात तणावाची स्थिती होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी व त्यांचे पथक तळ ठोकून होते.