पालिकेने अर्थसंकल्पाबाबत ऑनलाइन सभा आयोजित केली होती. नगरसेविका रूपाली जयस्वाल व भाजपच्या इतर नगरसेवकांनी ही सभा गाजविली. जे नगरसेवक सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलतात त्यांचा आवाज म्यूट केला जातो, असा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे ही सभा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला. या सभेत सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी, काॅंग्रेस व शिवसेनेचे जवळपास सर्वच नगरसेवक उपस्थित होते. विरोधी भाजप नगरसेवकांनीसुद्धा आवर्जुन हजेरी लावली. यापूर्वी महिला व बालकल्याण विकास योजनेच्या खर्च कार्यक्रमांतर्गत लाखोंची तरतूद करण्यात आली होती. मात्र सध्या या विभागाच्या सभापतिपदाची धुरा भाजप नगरसेवकाकडे आहे. त्यामुळे यावेळी किरकोळ तरतूद करण्यात आली. हा दुजाभाव विरोधकांनी लक्षात आणून दिला. त्यांनी सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली. अर्थसंकल्पातील इतरही अनेक त्रुटींवर बोट ठेवले. या त्रुटींमुळे अखेर महिला व बालकल्याण समितीच्या कार्यक्रमासाठी दोन लाखांवरून दहा लाखांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. इतर अनेक त्रुटींमुळे ही सभा तहकूब करून पुढे ढकलण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.
पूसदमध्ये अर्थसंकल्पीय सभा त्रुटींमुळे बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:56 AM