पुसद : तालुक्यातील राजना (भंडारी) या छोट्याशा खेड्यातील वर्षा कानपुरे हिने नेपाळ येथील युथ इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये हातोडाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देदीप्यमान कामगिरी केली.
इंटरनॅशनल पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने नेपाळ येथील पोखरा शहरात १५ ते १८ एप्रिल कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. यात वर्षा कानपुरे हिने हातोडाफेक स्पर्धेत ४६.०४ मीटर एवढ्या विक्रमी अंतरावर हातोडा फेकून सुवर्णपदक पटकाविले.
राजस्थानच्या पुष्कर जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या फेडरेशन कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वर्षाने अव्वल स्थान पटकावल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले होते.
सध्या ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनला शिक्षण घेत आहे. मागील तीन वर्षांपासून अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करीत आहे. तिला हनुमान व्यायामशाळा प्रसारक मंडळाचे डॉ. उत्तमचंद ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. तालुक्यातील राजना या छोट्याशा खेड्यातील वर्षाने ॲथलेटिक्स एशिया पॅसिफिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई चंदा कानपुरे, काका व डॉ. उत्तमचंद ठाकूर यांना देते.